सोलापूर : स्वामी विवेकानंद यांच्या विश्वबंधुत्व, मानवता आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचा जागर करण्याच्या उद्देशाने विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, सोलापूर शहराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विश्वबंधु दिवस विशेष संस्कार वर्ग शिबिराचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ सिनेअभिनेत्री श्रीमती स्मिता जयकर तसेच डॉक्टर रम्या -कन्नन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दीपप्रज्वलनानंतर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्कार वर्गांचे महत्त्व अधोरेखित केले. स्वामी विवेकानंद यांनी दिलेला राष्ट्रनिर्माण, चारित्र्यसंवर्धन आणि विश्वबंधुत्वाचा संदेश आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आल.
संस्कार वर्गांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करण्याचे कार्य होत असल्याचे विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रिसिजन कॅमशॉफ्ट च्या संचालिका डॉ. सुहासिनी शहा, केंद्राचे संचालक दीपक पाटील, महेश गोंजारी, नगर प्रमुख रवि कंटली, पंडित बिराजदार, वयंम प्रकल्प संचालक सुहास देशपांडे, मंडल प्रमुख विकास कुलकर्णी, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी मनीष बलदवा नीलिमा शितोळे ज्येष्ठ विधीज्ञ धनंजय माने विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांनी केले.
विश्वबंधु दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा जागृत होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Post Views: 17