अक्कलकोट – जिल्हाधिकारी म्हणून काम करताना स्वामींच्या आशीर्वादाने सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या. प्रशासनातही स्वामींचे तत्वज्ञान मार्गदर्शक ठरले. स्वामींच्या चरणी डोकं ठेवताच मन शांत होतं, मानसिक तणावाच्या संकटातही बळ मिळतं, म्हणून मी वर्षातून एकदा तरी अक्कलकोट ला भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतो कारण सेवा हाच खरा धर्म आहे हे स्वामींनीच शिकवलं असल्याचे मनोगत सोलापूरचे मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.
सोलापूर जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. या दरम्यान मंदीर समितीचे चेअरमन तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांचा श्री स्वामी समर्थांचे कॄपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी माजी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुढे बोलताना मा.जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की मी स्वामींचा निस्सीम भक्त आहे. अक्कलकोटची मातीही माझ्यासाठी पवित्र विभूती आहे.
सोलापूर ला जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असताना अनेक वेळा स्वामी दर्शनाचा योग आला. अक्कलकोटची पवित्र माती ही स्वामींच्या श्वासाने आज ही सुगंधीत आहे, म्हणून अक्कलकोट ला आल्यानंतर भक्त आपले सर्व दुःख व संकटे स्वामींचरणी अर्पण करतात आणि कृपेची प्रचिती घेऊन परततात असेही मनोगत व्यक्त केले. दर्शनानंतर भोसले साहेबांनी मंदिराच्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, प्रा.नागनाथ जेऊरे, विपूल जाधव, सागर गोंडाळ, गिरीश पवार आदींसह मंदीर समितीचे पदाधिकारी व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 9