बदनापूर – जिद्द, मेहनत, आधुनिक तंत्रज्ञान आणि
सेंद्रिय शेतीच्या बळावर जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्याने
राज्याच्या कृषि क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या
कृषि विभागातर्फे सन २०२३ व २०२४ या वर्षांसाठी देण्यात आलेल्या
राज्यातील सर्वोच्च कृषि पुरस्कारांमध्ये बदनापूर तालुक्यातील दोन
शेतकऱ्यांनी मानाचे स्थान पटकावत जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
रोवला आहे.
मुंबईतील वरळी येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमच्या डोममध्ये बुधवारी
(१ जुलै) झालेल्या भव्य राज्यस्तरीय कृषि पुरस्कार वितरण सोहळ्यात मौजे
वरूडी येथील प्रयोगशील शेतकरी जयकिसन रामदास शिंदे यांना “कृषिभूषण
(सेंद्रिय शेती) पुरस्कार – २०२३”, तर मौजे वाकुळणी येथील तरुण शेतकरी
सोमीनाथ सुधाकर अवघड यांना “युवा शेतकरी पुरस्कार – २०२३” प्रदान करण्यात
आला. या दुहेरी यशामुळे बदनापूर तालुक्याचा राज्यभर गौरव झाला आहे.
या सोहळ्यास महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा प्रमुख अतिथी
म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली
झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
सुनेत्राताई पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील, कृषि मंत्री दत्तात्रय भरणे, रोजगार हमी व
फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, कृषि राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मृद व
जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित
होते.

अत्यंत प्रतिकूल आर्थिक व भौगोलिक परिस्थितीवर मात करत जयकिसन शिंदे
यांनी सेंद्रिय शेतीमध्ये उल्लेखनीय प्रयोग राबविले आहेत. त्यांनी
रासायनिक खतांना पूर्णपणे फाटा देत दशपर्णी अर्क, निंबोळी पावडर,
ट्रायकोडर्मा, बायोडायनामिक कंपोस्ट, जीवामृत आणि इतर जैविक निविष्ठांची
स्वतः निर्मिती करून शेतीत यशस्वी वापर केला. माती परीक्षणानुसार संतुलित
खत व्यवस्थापन, हिरवळीच्या खतांचा वापर, ठिबक व तुषार सिंचन, नैसर्गिक
आच्छादन (मल्चिंग), शेततळे, वनराई बंधारे आणि विहीर पुनर्भरणाद्वारे
त्यांनी जलसंधारणाची प्रभावी अंमलबजावणी केली. बायोगॅस व सौरऊर्जेचा वापर
करून उत्पादन खर्चात बचत केली.
डाळिंब बागेत मधमाशी पेट्यांच्या साहाय्याने परागीकरण करून विषमुक्त
डाळिंब व सीताफळाचे दर्जेदार उत्पादन घेत त्यांनी सेंद्रिय फलोत्पादनाचा
आदर्श निर्माण केला आहे. ‘जयकिसन शेतकरी गट’ आणि ‘बंडूमामा नैसर्गिक शेती
प्रोड्युसर कंपनी’ स्थापन करून शेकडो शेतकऱ्यांना संघटित करण्याचे
महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. यापूर्वी त्यांना वसंतराव नाईक
शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार, कृषीथॉन पुरस्कार, ॲग्रोवन युवा शेतकरी
सन्मान आणि नवन्मेष किसान पुरस्कार यांसारखे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार
प्राप्त झाले आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर यशस्वी वाटचाल करणारे सोमीनाथ अवघड
वाकुळणी येथील तरुण शेतकरी सोमीनाथ अवघड यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या
प्रभावी वापरातून शेतीमध्ये नवे प्रयोग यशस्वी केले. औषध फवारणीसाठी
ड्रोन तंत्रज्ञान, मोटारसायकलचलित फवारणी यंत्र, कापूस लागवडीसाठी टोकण
यंत्र यांचा प्रभावी वापर करून त्यांनी उत्पादनात वाढ साधली.
कापूस व सोयाबीनची बीबीएफ यंत्रावर पेरणी, कापसाच्या अवशेषांचे
थ्रेशरद्वारे व्यवस्थापन, जीवामृत, गांडूळ खत व जैविक निविष्ठांचा वापर,
तसेच ‘दादा लाड’ तंत्रज्ञानाचा अवलंब करून त्यांनी शाश्वत शेतीचा आदर्श
निर्माण केला आहे.
‘स्वामी समर्थ शेतकरी गट’ आणि ‘हरित क्रांती नैसर्गिक शेती गट’ स्थापन
करून शेतमालावर प्रक्रिया करून थेट विक्रीचा उपक्रम राबविला. कृषि
विभागाच्या पीक स्पर्धेत गव्हाच्या उत्पादनासाठी तालुक्यात प्रथम क्रमांक
मिळविला असून, सिक्कीम येथे ‘आत्मा’ प्रकल्पांतर्गत सेंद्रिय शेतीचे
विशेष प्रशिक्षणही त्यांनी घेतले आहे. त्यांना ‘गंगाबाई माने सामाजिक
कृतज्ञता पुरस्कार’ देखील प्राप्त झाला आहे.
कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे मार्गदर्शन ठरले यशाचा पाया
या दोन्ही शेतकऱ्यांच्या यशामागे कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचा मोलाचा
वाटा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. गेल्या आठ वर्षांपासून हे दोन्ही
शेतकरी केव्हीकेचे सक्रिय संपर्क शेतकरी आहेत. केव्हीकेच्या
शास्त्रज्ञांनी दिलेले तांत्रिक मार्गदर्शन, नवीन वाणांची माहिती, जैविक
निविष्ठा निर्मिती, पीक संरक्षण, आधुनिक कृषी यंत्रसामग्रीचे प्रशिक्षण
आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब यामुळे या दोघांनाही राज्यस्तरीय यश
मिळविता आले.
जालना जिल्ह्याचा वाढला गौरव
राज्याच्या सर्वोच्च कृषि पुरस्कारांमध्ये बदनापूर तालुक्यातील दोन
शेतकऱ्यांची झालेली निवड ही केवळ त्यांची वैयक्तिक उपलब्धी नसून जालना
जिल्ह्यातील प्रगत, सेंद्रिय आणि आधुनिक शेतीच्या यशस्वी वाटचालीची
राज्यस्तरीय दखल असल्याची भावना व्यक्त होत आहे. या उल्लेखनीय
कामगिरीबद्दल दोन्ही पुरस्कार विजेत्यांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा
वर्षाव होत असून, त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील अनेक तरुण शेतकऱ्यांना
आधुनिक व शाश्वत शेतीची नवी प्रेरणा मिळाली आहे.





















