महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळाच्या कृषिदुतानी कौतुकास्पद लक्षणीय उपक्रमः हाती घेतला आहे. ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कळमण गावात शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात विषयतज्ज्ञ डॉ. व्ही. एस. गोरे यांनी शेतकरी व कृषी विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, शाश्वत शेती पद्धती आणि सेंद्रिय उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. गोरे यांनी रासायनिक खतांचा संतुलित वापर, सेंद्रिय खतांचे महत्त्व, गांडूळखत, जीवामृत, बीजप्रक्रिया, जैविक कीड व रोग व्यवस्थापन तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढण्याबरोबरच पर्यावरण संवर्धन, जमिनीची सुपीकता आणि शेतकऱ्यांचे दीर्घकालीन आर्थिक हित साध्य होण्यास मदत होत असल्याचे त्यांनी सांगितले. व्याख्यानानंतर शेतकरी व विद्यार्थ्यांनी सेंद्रिय शेतीसंदर्भातील विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर डॉ. गोरे यांनी प्रत्यक्ष अनुभवांच्या आधारे समाधानकारक उत्तरे देत आधुनिक व शाश्वत कृषी तंत्रज्ञान स्वीकारण्याचे आवाहन केले. या व्याख्यानाला कळमण गावातील अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे, रावे कार्यक्रम समन्वयक अधिकारी डॉ. दावणे व्ही. टी. यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कळमण गावातील कृषिदूत सुयोग सरडे, सुचित साळुंखे, प्रणव पिसाळ, संकेत वानखेडे, सुरेश बगले, ऋषिकेश बिचुकले, विशाल धर्मशाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून या उपक्रमास साक्रिय सहभाग दिला.























