सोलापूर – मंद्रूप पासून एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सीतामय तलावातून मंद्रूपला पाणीपुरवठा सुरू केल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होईल. तसेच वारंवार भेडसावणारा पाणी प्रश्नही सुटणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी मंद्रूपच्या पाण्याचे राजकारण न करता पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘काखेत कळसा अन् गावाला वळसा’ या म्हणीप्रमाणे सीतामाय तलावात मोठ्या प्रमाणात पाणी साठवण असताना सत्ताधार्यांकडून दोन महिन्यापासून मंद्रूपकरांची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून होत असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे टॅंकरमधून सोलापूरातून पाणी आणण्याऐवजी सीतामाय तलावातील पाण्याचे शुध्दीकरण केल्यास पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकते. त्यामुळे त्या पाण्याचे शुद्धीकरण करून मंद्रूप मध्ये पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे .

मंद्रूपपासून एक किलोमीटर अंतरावर सीतामाय तलाव आहे. या तलावाचे खोलीकरण करण्यात आल्यामुळे पावसाच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात साठवण करण्यात आले आहे . शिवाय पाझर तलाव असल्यामुळे उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या कॅनाॅल मधूनही पाणी सोडण्यात येते . त्यामुळे सध्या तलावात मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. मंद्रूप ग्रामपंचायत सोलापूर येथून टँकरद्वारे पाणी आणून पाण्याच्या टाकीत साठवण करीत आहे . यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही येत आहे . त्यामुळे इंदिरानगर पासून अवघ्या आठशे ते हजार फूट अंतरावर असणाऱ्या सीतामय तलावात जलवाहीनी टाकून त्याचे शुद्धीकरण करण्यात यावे , तसेच गावाला पाणीटंचाईच्या काळात तलावातील पाण्याचे वापर करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चाची ही गरज नाही . गावात मोठ्या प्रमाणात पाणी असतानाही सोलापुरातून पाणी आणून पाणीपुरवठा करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे सीतामाय तलावातील पाण्याची तपासणी करून व शुध्दीकरण केल्यास पाणीटंचाईवर उपाययोजना करणे शक्य होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
….
चौकट
….
सत्ताधार्यांकडून पाण्याचे राजकारण
….
ऊन्हाळ्यात पाणीटंचाई गृहीत धरून मार्च महिन्याच्या बैठकीत सीतामाय तलावातील पाणीवापरासंबंधी सरपंचांना सुचविण्यात आले आहे. चार महिन्यात त्याकडे दुर्लक्ष झाल्याने दोन महिन्यांपासून मंद्रूपला पाणीटंचाई भेडसावत आहे. सीतामाय तलावातील पाण्याचे शुध्दीकरण करून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. मात्र सत्ताधारी पाण्याचे राजकारण करून मंद्रूपकरांना वेठीस धरत आहे.
शिवपुत्र जोडमोटे, सदस्य, ग्रामपंचायत मंद्रूप
….
एक महिन्यांपासून
प्रशासनाकडे पाठपुरावा
…..
मंद्रूपचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा सुरु आहे. टंचाई काळात सीतामाय तलावातून पाण्याचे शुध्दीकरण करून पाणीपुरवठा सुरु करण्यासाठी पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे. जिल्हा परीषद सदस्य सोनाली कडते व मी प्रशासनाला सूचना दिली आहे.
मळसिध्द मुगळे, सदस्य, पंचायत समिती मंद्रूप
….
आमदारांनी सहकार्य करण्याची गरज
….
सीतामाय तलावातून पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आराखडा करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला सांगण्यात आले आहे. टंचाई काळात प्रक्रीया जलद होण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी प्रशासनाला सूचना देण्याची गरज आहे. यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी सहकार्य होईल.
भगवान व्हनमाने, उपसरपंच, मंद्रूप
…





















