मंगळवेढा – सोलापूर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई व एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. मात्र या आदेशात मंगळवेढा तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र झाली आहे. शेजारच्या काही तालुक्यांतील नदीकाठच्या कृषी पंपांना दररोज ५ तास वीजपुरवठा देण्यात आला असताना, मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांना केवळ २ तास वीजपुरवठा करण्यात आल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण, बठाण, माचणूर, सिद्धापूर, अरळी या भीमा नदीकाठावरील परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस, द्राक्ष, केळी तसेच भाजीपाला पिकांची लागवड आहे. या भागातील बंधाऱ्यांवरच हजारो एकर शेती अवलंबून असून, उचेठाण बंधाऱ्यावरून मंगळवेढा शहरासह भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेलाही पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे या बंधाऱ्यांवरील पाण्याचा वापर आधीच मोठ्या प्रमाणात होत आहे.यावर्षी उजनी धरणातून पाणी उशिरा सोडल्याने नदीकाठचा भाग आधीच संकटात सापडला होता. त्यातच आता कृषी पंपांसाठी वीजपुरवठा केवळ दोन तासांवर आणल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे, उजनी धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा असून वीर धरणातील पाणीही भीमा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची उपलब्धता असतानाही मंगळवेढा तालुक्यालाच कमी वीजपुरवठा देण्यामागचे कारण काय, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.नदीकाठचा हा परिसर साखर कारखान्यांसाठी ऊस पुरवठा करणारा महत्त्वाचा पट्टा मानला जातो. ऊसासह द्राक्ष, केळी आणि भाजीपाला पिकांना नियमित पाणी देणे अत्यावश्यक असताना केवळ दोन तास वीजपुरवठा मिळाल्यास पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे, आमदार समाधान आवताडे, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण तसेच शिवसेना कामगार सेनेचे राजकुमार स्वामी यांनी मंगळवेढा तालुक्यातील कृषी पंपांना इतर तालुक्यांप्रमाणे पाच तास वीजपुरवठा देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मात्र अद्याप या मागणीवर कोणताही सकारात्मक निर्णय झालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे.
“काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे म्हणाले, “दक्षिण सोलापूर तालुक्याप्रमाणे मंगळवेढा तालुक्यालाही कृषी पंपांसाठी पाच तास वीजपुरवठा द्यावा. जिल्ह्यातील दोन तालुक्यांसाठी वेगवेगळे निकष लावल्याने शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण होत आहे.”
॥ सिद्धापूर येथील शेतकरी अनिल बिराजदार यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटले, “निसर्गाच्या कृपेने हिरवीगार झालेली पिके वाळवून सरकारला शेतकऱ्यांच्या चिताच रचायच्या आहेत का? मंगळवेढा सोडून सर्वत्र चार-पाच तास वीज दिली जाते, मग आमच्यावरच हा अन्याय का? लोकप्रतिनिधींच्या मागण्यांनाही सरकार प्रतिसाद देत नाही का? तालुक्यातील शेतकऱ्यांवर सरकारने सूडाची भावना ठेवली आहे का, असा प्रश्न आम्हाला पडला आहे.”
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे मंगळवेढा तालुक्यातील नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून, मंगळवेढा तालुक्यालाही इतर तालुक्यांप्रमाणे पाच तासांचा कृषी वीजपुरवठा तातडीने लागू करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनांकडून दिला जात आहे.