सोलापूर : शहरातील ७४ नाल्यांच्या रेखांकनामुळे विकासकामांवर मर्यादा येत असल्याचा मुद्दा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निदर्शनास आणून दिला असून, नाल्यांचे फेरसर्वेक्षण करण्यासंदर्भातील तातडीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात येणार असल्याची माहिती सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी दिली.
महापालिका प्रशासनाकडून एकीकडे लेआऊट मंजूर केले जातात, नागरिकांना बांधकाम परवानग्या दिल्या जातात; मात्र त्यानंतर अचानक संबंधित जागेतून नाला दाखविला जातो. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून विकासकामांनाही अडथळा निर्माण होत आहे. ही परिस्थिती योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
शहरात ७४ नाल्यांचे रेखांकन करताना आवश्यक तांत्रिक अभ्यास झाला का, प्रत्यक्ष पाण्याचा प्रवाह, नैसर्गिक उतार, पाण्याची पातळी आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांचा सखोल विचार करण्यात आला का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे काळे यांनी नमूद केले. त्यामुळे संपूर्ण नाले रेखांकनाचे फेरसर्वेक्षण करून वस्तुस्थिती तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. ७४ नाल्यांच्या विद्यमान रेखांकनामुळे शहराच्या विकासावर कशाप्रकारे परिणाम होत आहे, याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर फेरसर्वेक्षणासंदर्भातील प्रस्ताव सभागृहात मांडण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्याचे काळे यांनी सांगितले.
शहर विकासाच्या दृष्टीने या विषयाकडे पाहण्याची गरज असून, ७४ नाल्यांचा प्रत्यक्ष ग्राउंड सर्व्हे करून अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्या दुरुस्त होणे अपेक्षित होते. कोणाचाही अहंकार आड न येता समन्वय आणि सकारात्मक भूमिकेतून हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. त्यामुळेच फेरसर्वेक्षणाचा प्रस्ताव सभागृहात आणण्याचा निर्णय घेतल्याचे सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.
Post Views: 22