सोलापूर – टाळ मृदंगाचा गजर. जय जय विठोबा रखुमाई… सुंदर ते ध्यान उभे विटेवर… असा भजनाचा जयघोष सुरू होता. महाराजांच्या पाखलीचे दर्शन घेण्यासाठी अबालवृध्द तुळजापूर-सोलापूर रस्त्यांच्या दुर्तफा लोटले होते. महाराजांचे रूप आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी सगळेच आतुर होते. माऊली… माऊली म्हणत प्रत्येकजण पाखलीचे दर्शन घेत होता. हा भक्ती आणि चैतन्याचा क्षण गजानन महाराज पालखी सोहळ्याचा होता.
शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमाराला पालखी सोहळा मराठवाड्याच्या सर हद्दीवर असलेल्या तामलवाडी येथून सोलापूर जिल्हयातील गंगेवाडी फाटयाजवळ आला आणि भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी होती. फुलांचा वर्षाव, टाळ, मृदंग जय हरी नावाचा जयघोष मनाला आनंद व मांगल्य देऊन गेला. लहान थोरांचे हात आपोआप जोडले जात होते. सायकांळी सहाच्या सुमाराला उळेगावात शेगावीचा राणा गजानन महाराज यांचा सोहळा विसावला, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
पालखी मार्गापासून रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. वारकऱ्यांसाठी उभारण्यात आलेल्या वॉटरप्रूफ तंबूत वारकरी विसावले. गावकरी यांची लगबग सुरूच होती. स्वयंपाकासाठी अनेकजण झटत होते. भाविकांसाठी तयार होत असलेल्या प्रसादाचा सुंगध, फुलांचा गंध आणि भक्तीचा मेळा जणू विठ्ठल नामात एकरूप झाला होते.
हा सोहळा उळेगाव येथे आल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी पालखीचे जंगी स्वागत केले. त्यांनी महाप्रसादाची व्यवस्था केली होती. ग्रामपंचायतच्या वतीने भाविकांना सर्व सोयी सुविधा देण्यात आल्या. तर पहाटे साडेपाचला पालखी उळेगावातून प्रस्थान ठेवेल.
सकाळी साडेसात ते नऊ या दरम्यान तळे हिप्परगा येथील मश्रूम गणपती मंदिरासमोर पालखी आल्यानंतर गजानन महाराजांची आरती होणार आहे. पन्नास वर्षापासून हा उपक्रम चालू आहे. यानंतर दुपारी साडेअकराला पालखी सम्राट चौकातील सद्गुरू प्रभाकर महाराज मंदिरात आल्यानंतर संत भेटीचा सोहळा व आरती होणार आहे. सायंकाळी सहाला पालखी सोहळा कुचन प्रशाला येथे मुक्कामी राहणार आहे. या सोहळ्यात जवळपास
७०० वारकरी, त्यापैकी ४०० टाळकरी, दोन अश्व, नऊ वाहने आहेत. या वारकऱ्यांचा प्रवास शिस्तबद्ध आणि संतांच्या सर्व परंपरा पाळून सुरु असतो. पालखी सोहळ्याचा प्रवास नऊ जिल्हयातून, २२ दिवसाचा व ७५० किलोमीटरचा असल्याची माहिती भाविकांनी दिली.
,………….. चौकट
महाप्रसादाची सकाळपासून जय्यत तयारी
शंभरहून अधिकजण सकाळपासून भाजी चिरणे, धान्य निवडणे अशी तयारी करीत होते. चपाती, आमटी, भाजी, शिरा, भात, कडक भाकरी असा महाप्रसाद होता. पाचशेहून अधिक स्वयंसवेक व संपूर्ण गावच तयारीसाठी सज्ज होता. स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, गरम पाण्याची सोय, पायाचे मसाज करण्यासाठी मशीनची सोय होती. सायंकाळी पालखी गावात आल्यानंतर आरती झाली. प्रसाद वाटप झाले. श्रींच्या दर्शनासाठी सोलापूर शहर आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती. यंदा भाविकांना सुविधा वाढविल्याची माहिती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी दिली
Post Views: 10