वडीगोद्री – मुख्यमंत्री जन आरोग्य शिबिर अभियानांतर्गत वडीगोद्री येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या शिबिरात एकूण २११ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २० रुग्णांमध्ये मोतीबिंदू,५ रुग्णांमध्ये रेटिना (डोळ्यात पडदा) विकार तर १२ रुग्णांमध्ये गंभीर नेत्रविकार आढळून आले असून संबंधित रुग्णांवर पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सचिवालय,मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,जालना यांच्या मार्गदर्शनाखाली शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान,मुख्यमंत्री सहाय्यता निधी,जिल्हा आरोग्य विभाग जालना,लायन्स नेत्र रुग्णालय,छत्रपती संभाजीनगर आणि शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र,वडीगोद्री येथे शुक्रवारी (दि. १७) सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे शिबिर पार पडले.
शिबिरात मोतीबिंदू,काचबिंदू,मधुमेहामुळे होणारे नेत्रविकार,कमी दृष्टी,धूसर दिसणे,रात्री कमी दिसणे,डोळे दुखणे,दृष्टीतील बदल आदी विविध नेत्रविकारांची अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत तपासणी केली.मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांच्यासाठी पुढील उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे.तसेच गरजू नागरिकांना दर्जेदार चष्मे नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात आले.
लायन्स नेत्र रुग्णालयाच्या अत्याधुनिक फिरत्या नेत्रसेवा वाहनामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात न जाता गावातच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध झाली. त्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.शिबिराला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी,सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी,सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांनी ग्रामीण भागात अशा प्रकारचे आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शिबिर समन्वयक सचिन आडे व शुभम दाभाडे,नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.मंथन बदर,डॉ.सुमित गवळी,डॉ.अनघा डोळसकर तसेच तंत्रज्ञ अमोल भुजंग,रोहन शिंदे,अविनाश सोनवणे आणि भरत पाटणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे आयोजन शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.आर.व्ही.छल्लारे यांच्या पुढाकारातून करण्यात आले.ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या दारीच दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.






















