सोलापूर – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांसाठी प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दि. 18 जुलै 2026 पासून सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. प्रवाशांनी सुधारित भाडेदरांची नोंद घ्यावी व प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी केले आहे.

शासनाच्या निर्णयानुसार डिझेल, चाजीज, टायर तसेच महागाई भत्त्यात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सक्षम प्राधिकाऱ्यांनी भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. महामंडळाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार साधी, जलद, रातराणी, मिनी बस आणि शिवशाही या सेवांच्या प्रवास भाड्यात सुमारे 13.43 टक्के, तर विनावातानुकूलित शयन आसनी व शयनयान सेवांच्या भाड्यात 13.55 ते 13.56 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच ई-बस, निमआराम आणि ई-शिवनेरी सेवांमध्येही वाढीव दर लागू करण्यात आले आहेत.
चौकट
असे आहेत प्रति टप्पा नवीन दर
साधी/जलद/रातराणी/मिनी बस/जिजाऊ : 10.05 वरून 11.40
विनावातानुकूलित शयन आसनी: 13.65 वरून 15.50
विनावातानुकूलित शयनयान: 14.75 वरून 16.75
चौकट
या मार्गांवरील नवीन भाडे असे
सोलापूर – पुणे: साधी 480 रुपये, ई-बस 670, शयन आसनी 655, शयनयान 705
पंढरपूर – पुणे: साधी 415 रुपये, ई-बस 575, शयन आसनी 560, शयनयान 605
अक्कलकोट – पुणे: साधी 560 रुपये, शयन आसनी 765, शयनयान 825




















