पंढरपूर – तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीवर संरक्षक रासायनिक लेपन करण्याच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या निर्णयाला कंदील दाखवला आहे. मुख्य जिल्हा न्यायाधीश मनोज एस.शर्मा यांनी शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालात, पंढरपूरच्या कनिष्ठ न्यायालयाने मंदिर समितीवर घातलेला तात्पुरता मनाई हुकूम पूर्णपणे रद्द केला आहे.
श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे वारकरी भाविकांना थेट पदस्पर्श दर्शन देण्यात येते. दररोज हजारो भाविक दर्शन घेतात. त्यामुळे मूर्तीची झीज होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या शिफारशीनुसार मंदिर समितीने २३ आणि २४ जून रोजी विठ्ठल मूर्तीच्या संरक्षणासाठी लेपन प्रक्रिया करण्याचे निश्चित केले होते. मात्र, या प्रक्रियेला महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य पुरुषोत्तम ऊर्फ गणेश लंके आणि बाळकृष्ण डिंगरे यांनी येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून आव्हान दिले होते.
त्या मध्ये ‘शास्त्रानुसार रासायनिक लेपन न करता केवळ पारंपारिक पध्दतीने ‘वज्रलेप’ केला जावा. लेपन प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे मुर्तीवर परिणाम होतो. त्या बरोबरच भाविकांच्या धार्मिक भावना देखील दुखावत आहेत’, असा दावा त्यांनी केला होता. येथील न्यायालयाने २२ जून रोजी मंदिर समितीला या प्रक्रियेपासून रोखणारा तात्पुरता मनाई हुकूम दिला होता. त्यामुळे मंदिर समितीला पूर्वनियोजित काम स्थगित करावे लागले.
दरम्यान, या आदेशाविरोधात मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी समितीचे विधिज्ञ पी.बी.शेंडे, अॅड.व्ही.के.जाधव यांच्या माध्यमातून सोलापूर येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात अपील दाखल केले होते. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरातत्त्व विभागाचा अहवाल तपासल्यानंतर मुख्य जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांनी कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवून रद्द केला.
या निर्णयामुळे आता आषाढी यात्रेपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन आणि दुरुस्तीच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.या खटल्यात मंदिर समितीतर्फे अॅड.पी.बी.शेंडे यांनी तर मूळ वादींतर्फे अॅड.एस.के.रानडे यांनी युक्तिवाद केला.
—————————-
चौकट : ( यापूर्वी तब्बल चार वेळा करण्यात आले होते लेपन )
मंदिर समितीकडून १९८८, २००५, २०१२ आणि २०२० असे यापूर्वी देखील श्री विठ्ठल मुर्तीवर रासायनीक लेपन करण्यात आलेले होते.
—————————-
Post Views: 15