बार्शी – बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला घरातून पळवून नेऊन तिच्याशी लग्न करत वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षे ९ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला आरोपी अबक ( नांव बदलेले) याने २ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरातून पळवून नेले होते. त्यानंतर आरोपीने गावातीलच एका मंदिरात तिच्याशी विवाह केला.
पीडित मुलगी ही कायद्याने अल्पवयीन आहे हे माहीत असतानाही, आरोपीने २ डिसेंबर २०२५ ते २० जुलै २०२६ या कालावधीत तिच्याशी तिच्या संमतीशिवाय वारंवार शारीरिक संबंध ठेवले. या सततच्या अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे.
या छळाला कंटाळून अखेर पीडितेने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी अबक (नाव बदलेले) याच्या विरुद्ध बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ६४ (२) (F), ६४ (२) (I), ६४ (२) (M) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोक्सो कायदा) चे कलम ४, ६ आणि ८ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन गुन्ह्याचा प्राथमिक वर्दी रिपोर्ट जे.एम.एफ.सी. न्यायालय बार्शी यांना सादर करण्यात आला आहे. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
Post Views: 24