सोलापूर – नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार, विद्यार्थ्यांची आत्महत्या आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-युवकांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळच्या सत्रात सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आल्याचे दिसून आले. या बंदमुळे शेतकरी हाताशपणे कांद्याच्या पोत्यावर बसलेले चित्र दिसून आले.
बंदला पाठिंबा दर्शवत सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला. मात्र, या निर्णयाचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसल्याने बाजार समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. लिलाव काही काळ बंद राहिल्यामुळे बाजारात दाखल झालेला कांदा खराब होण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी तातडीने लिलाव सुरू करण्याची जोरदार मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास बाजार समितीसमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
दरम्यान, श्री सिद्धेश्वर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी सुमारे १०० ट्रक कांदा विक्रीसाठी दाखल झाला होता. मात्र माथाडी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदमुळे सकाळी कोणती लिलाव प्रक्रिया सुरू झाली नाही. दुपार झाल्यानंतर देखील बंद मागे घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आक्रमक भूमिका घेत, रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर संभाव्य आंदोलनाची दखल घेत बाजार समिती प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारी ४ वाजेनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू करण्यात आले. त्यामुळे बाजारातील तणाव निवळला आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
कोट
बाजार समितीत सकाळ सत्रात कांदा लिलाव झाला नाही. कामगारांनी बंद पुकारल्याने लिलाव प्रक्रिया वेळेत सुरू झाली नाही. मात्र दुपारी चार वाजता कांदा लिलाव सुरळीत करण्यात आला.
– अतुलसिंग राजपूत, सचिव बाजार समिती श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर
कोट
वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे बाजार समितीत सकाळ सत्रात व्यापार ठप्प झाले. लिलाव प्रक्रिया वेळेत सुरू झाली. बाजारात कांद्याची आवक सुमारे १०० ट्रक इतकी झाली होती. दुपारनंतर कांदा लिलाव सुरू झाले.
– सादिक बागवान, कांदा अडत व्यापारी
कोट
शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत आपल्या आर्थिक हिताचा प्रश्न ऐरणीवर आणला आणि त्यांच्या दबावानंतर प्रशासनाला लिलाव सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
– संभाजी भोसले, कांदा उत्पादक शेतकरी
Post Views: 16