सोलापूर – आषाढ शुद्ध एकादशीच्या पावन पर्वानिमित्त सोलापूर शहरातील ऐतिहासिक जुने विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे साडेपाच वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा पारंपरिक काकडा होऊन उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित भाविकांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना जल-दुग्धधारा अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर भाविकांना शांत व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी मंदिर परिसरात अखंड नामस्मरण, हरिनामाचा गजर आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले. मंदिरात श्री संत गजानन महाराज (शेगाव) यांच्या तीन दिवसांच्या पारायणाची सांगता करण्यात आली. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. “ज्यांना रक्तदान करता येईल त्यांनी पुढे यावे” असे आवाहन करण्यात आले असून अनेक भाविकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) मधील महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि धार्मिक वातावरणात एकमेकांना सहकार्य करत एकादशीचा उत्सव साजरा केला.

हा संपूर्ण धार्मिक सोहळा मंदिराचे विश्वस्त सुहास जोशी, अविनाश जोशी, अनंत राधाकृष्ण जोशी, अंबादास जोशी आणि रमेश पांडुरंग जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे मंदिर परिसर विठ्ठलनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आणि आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिभाव, सामाजिक संदेश आणि सेवाभावाचा सुंदर संगम ठरला.



















