पंढरपूर – आषाढी वारी २०२६ च्या कालावधीत पंढरपूर येथील चंद्रभागा नदीपात्रात भाविकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बचाव पथकाने केलेल्या तात्काळ कार्यवाहीमुळे मोठा अनर्थ टळला. २१ जुलै ते २६ जुलै २०२६ या पाच दिवसात एकूण ३५ नागरिकांचे नदीपात्रातून सुरक्षित बचाव करण्यात आले.
हे संपूर्ण बचाव कार्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी. एस.कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तथा नोडल अधिकारी शक्तिशागर ढोले यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखालील बचाव पथकाने पार पाडले.
वारीच्या गर्दीमुळे आणि उजनी-नीरा धरणातून झालेल्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ झाली होती. त्यामुळे नदीपात्रात उतरणाऱ्या भाविकांसाठी धोका निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदीकाठावर २४ तास गस्त ठेवून बचाव यंत्रणा सज्ज ठेवली होती.
——————
चौकट : ( प्रशासनाची खबरदारी आणि समन्वय )
जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी बचाव कार्यावर दररोज आढावा घेतला. नदीकाठावर पोल निहाय होमगार्ड, गोताखोर आणि एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले. धोकादायक ठिकाणी बॅरिकेडिंग, लाईफ जॅकेट आणि अनाउन्समेंटद्वारे भाविकांना सतर्क करण्यात आले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिशागर ढोले यांच्या नियंत्रणाखालील पथकाने वेळेत हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या जलद आणि समन्वयपूर्ण कार्यवाहीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
——————
चौकट : ( दरोजचा बचाव कार्याचा अहवाल )
२१ जुलै २०२६ – तीन जणांचे बचाव. २२ जुलै – सात जणांचे बचाव. २३ जुलै – शुन्य. २४ जुलै – ९ जणांचे बचाव. २५ जुलै १५ जणांचे बचाव. – दि.२६ जुलै – एक जणांचा बचाव.
——————
चौकट : ( पाणी वाढत असल्याने प्रशासनाकडून आवाहन)
दरम्यान प्रशासनाने भाविकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, पाणीपातळी वाढत असल्याने नदीपात्रात जाऊ नये. लहान मुले आणि वृद्धांनी विशेष काळजी घ्यावी.
–महेश भंडारकवठेकर २६-०७-२०२६—
Post Views: 12