बार्शी – कारगील युद्धातील शूरवीरांना अभिवादन करण्यासाठी बार्शी तालुका माजी सैनिक संघटना यांच्यावतीने कारगील विजय दिवस शहीद स्मारक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत उपस्थित होते. त्यांनी शहीद जवानांच्या स्मृतींना पुष्पहार अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली आणि दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, आजचा दिवस हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि श्रद्धेचा दिवस आहे. कारगीलच्या दुर्गम शिखरांवर देशासाठी प्राणांची बाजी लावणाऱ्या आपल्या शूर जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला मी कोटी कोटी नमन करतो. त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण शांततेने आणि अभिमानाने जगत आहोत. कारगील युद्ध हे केवळ एक युद्ध नव्हते, तर ते आपल्या सैन्याच्या पराक्रमाची, एकजुटीची आणि राष्ट्रभक्तीची पराकाष्ठा होती. प्रतिकूल परिस्थितीत, उंच बर्फाच्छादित शिखरांवर लढून पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या आपल्या वीरांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, भारतीय सैनिक काय करु शकतो. बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे मी विशेष अभिनंदन करतो. शहीदांच्या स्मृती जपण्यासाठी आणि नवीन पिढीमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ते जे काम करत आहेत ते अत्यंत स्तुत्य आहे. शहीदांच्या कुटुंबीयांची काळजी घेणे, त्यांचा सन्मान करणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.
कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व माजी सैनिक यांनी सांगितले की, २५ वर्षांपूर्वी कारगीलच्या बर्फाळ शिखरांवर आपल्या जवानांनी जे शौर्य दाखवले, त्याची गाथा आजही आमच्या अंगावर काटा आणते. आम्ही सैनिक असलो तरी त्या युद्धात शहीद झालेल्या आमच्या बांधवांच्या त्यागासमोर आम्ही नतमस्तक आहोत. कारगीलचा विजय हा केवळ लष्कराचा विजय नव्हता, तर १४० कोटी भारतीयांचा विजय होता. त्या दिवशी प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीचा अभिमान जागा झाला होता. आज आमदार राजेंद्र राऊत साहेबांनी शहीद स्मारकावर येऊन आम्हाला दिलेला मान-सन्मान आमच्यासाठी खूप मोठा आहे. शहीदांच्या कुटुंबीयांना शासनाने दिलेल्या सर्व सुविधा वेळेवर मिळाव्यात आणि त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही तरुण पिढीला आवाहन करतो की, मोबाईल बाजूला ठेवून देशासाठी काहीतरी करा. सैन्यात भरती व्हा, देशसेवा करा. कारण देश आहे तर आपण आहोत.
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, आसिफ तांबोळी, जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, बार्शी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्वीनी कथले, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गरड, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, पंचायत समिती सभापती सौ. मिनाक्षीताई रोंगे, संभाजी घाडगे तसेच सुभेदार चांगदेव सुरवसे (सेवानिवृत्त) (अध्यक्ष: माजी सैनिक संघटना, बार्शी) व बार्शी तालुका माजी सैनिक संघटना संचालक मंडळ व सर्व सभासद व इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते..