बार्शी – कारगिल विजय दिनानिमित्त बार्शी शहरातील शहीद स्मारक येथे कारगिल विजय दिवस अत्यंत देशभक्तीपूर्ण, भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कारगिल युद्धातील शूरवीर जवानांना यावेळी पुष्पचक्र अर्पण करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमाला सोलापूर विधान परिषद मतदारसंघाचे आमदार राजाभाऊ राऊत, जिजाऊ गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे, बार्शी नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. तेजस्विनी कथले, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, बार्शी मार्केट कमिटीचे चेअरमन विजय गरड, माजी सैनिक परिषदेचे अध्यक्ष मेजर सुरवसे तसेच बार्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी कारगिल युद्धातील शूर सैनिकांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. युवकांनी देशभक्तीची प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवेसाठी सदैव तत्पर राहावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथील शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत शहीद जवानांना विनम्र अभिवादन केले. संपूर्ण परिसर “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” आणि “जय हिंद” या घोषणांनी दुमदुमून गेला.
कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आयोजित हा कार्यक्रम प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना अधिक दृढ करणारा आणि शूरवीर जवानांच्या अमूल्य बलिदानाची जाणीव करुन देणारा ठरला.