सोलापूर : महापालिकेच्या अभय योजनेअंतर्गत गाळे सील करण्याचे दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण न करता आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भूमी व मालमत्ता विभागातील लँड फी, मेजर गाळे आणि मिनी गाळे पथकातील १४ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी आदेश जारी केले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत अभय योजनेअंतर्गत शहरातील गाळेधारकांच्या थकबाकीवरील दंडाची १०० टक्के माफी देऊन सप्टेंबर २०२६ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तसेच थकबाकी न भरणाऱ्या गाळेधारकांचे गाळे सील करण्यासाठी वसुली पथके स्थापन करून दररोज किमान पाच गाळे सील करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.
मात्र, संबंधित पथकांनी सोमवारी हे उद्दिष्ट पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल उत्पन्न वाढीस बाधा आणल्याबद्दल महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांतर्गत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी यांनी या सदर्भात कर्मचाऱ्यांचा अहवाल सादर केला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त पवार यांनी ही कारवाई केली.
लँड फी पथकातील पाच कर्मचाऱ्यांवर प्रत्येकी ५ हजार रुपये दंड करण्यात आला आहे. यामध्ये आर. एस. शिवशिंपी, श्रीकांत यादव, सचिन गडदे, ए. व्ही. क्षीरसागर आणि सोमनाथ अंकुशे यांचा समावेश आहे.
मेजर गाळे पथकातील बी. आर. रोडगे, डी. एम. बनसोडे, विजय जाधव आणि अनिल तडलगी यांच्यावर प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
मिनी गाळे पथकातील पी. पी. जाधव, रघुनाथ सुरवसे, राजरत्न कांबळे, एस. एन. कुरापाटी आणि अजिंक्य चव्हाण यांच्यावरही प्रत्येकी १ हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. दंडाची रक्कम जुलै पेड इन ऑगस्ट २०२६ च्या वेतनातून वसूल करण्यात येणार आहे.
वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे, कामात हलगर्जीपणा करणे आणि महसूल वसुलीच्या कामात अडथळा निर्माण करणे हा गंभीर शिस्तभंग आहे. भविष्यात अशा प्रकारच्या निष्काळजीपणाबाबत अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी दिला आहे.
———
Post Views: 13