सोलापूर – ग्रामीण भागातील महिलांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळावा, यासाठी जिल्हा परिषद सोलापूरच्या महिला व बालकल्याण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सन २०२६-२७ मधील विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जाणार असून, यंदा प्रथमच जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांमधूनच अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना जिल्हा परिषद कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती अमृता वाघे यांनी दिली.
महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांसाठी यंदा ३२५.४८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून महिलांच्या स्वावलंबनासाठी शिलाई मशीन, पिठाची गिरणी, एमएस-सीआयटी, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, कराटे प्रशिक्षण, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे.
याशिवाय ग्रामीण भागातील शालेय मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी सायकल अनुदान योजनेच्या निधीत वाढ करून १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अर्जदारांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीतील महिला व बालकल्याण विभाग किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. ३० ऑगस्टनंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने मुदतीत अर्ज करण्याचे आवाहन सभापती अमृता वाघे यांनी केले आहे. या सभेस महिला व बालकल्याण विभाग समितीचे सदस्य उपस्थित होते.
चौकट
अर्जासाठी आवश्यक माहिती
अर्ज कालावधी : १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट २०२६
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण : संबंधित तालुक्याची पंचायत समिती
महिला व बालकल्याण विभाग / बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय
चौकट
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
रहिवासी दाखला
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
शाळेचा दाखला (सायकल अनुदानासाठी)
कोट
योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल करा
महिलांना योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेत येण्याची गरज भासू नये, यासाठी सर्व पंचायत समित्यांमध्ये अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. पात्र महिलांनी मुदतीची वाट न पाहता आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा.
– अमृता वाघे, सभापती, महिला व बालकल्याण समिती
Post Views: 6