सोलापूर : घोंगडे वस्तीतील ९ वर्षीय समर्थ स्वामी या बालकाच्या संशयित रेबीजमुळे झालेल्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेऊन शहरातील भटक्या श्वानांच्या वाढत्या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. भटके, जखमी तसेच रेबीजग्रस्त श्वानांवर त्वरित कारवाई करून कायमस्वरूपी नियंत्रणासाठी विशेष कृती आराखडा राबविण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, उपअभियंता अविनाश वाघमारे, शहर सुधारणा समितीच्या सभापती स्वाती बडगु, नगरसेवक राजकुमार पाटील, संजय कोळी, विनायक विटकर, प्रवीण दर्गो पाटील तसेच भाजपचे मंडल अध्यक्ष दत्ता बडगु उपस्थित होते.
बैठकीत आमदार देशमुख यांनी शहरात आतापर्यंत किती भटक्या श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आले, त्यासाठी किती खर्च झाला आणि पुढील उद्दिष्ट काय आहे, याची माहिती मागविली. केवळ निर्बीजीकरणावर भर न देता भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.महानगरपालिका मुख्यालयाच्या आवारातही मोठ्या प्रमाणात भटके श्वान मुक्तपणे फिरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत, महापालिकेच्या परिसरातील श्वानांचाही तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी त्यांनी केली. नागरिक आणि कर्मचारी यांची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्याने सुनिश्चित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
समर्थ स्वामी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. समर्थच्या वडिलांनाही गंभीर आजार असल्याने शासनाने विशेष बाब म्हणून या कुटुंबाला १० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविल्याची माहितीही त्यांनी दिली.
Post Views: 9