सोलापूर : पगारातील कथित कपात, ईएसआय-पीएफसंदर्भातील तक्रारी, नादुरुस्त घंटागाड्या तसेच सुरक्षा साहित्याच्या अभावाविरोधात सोलापूर महानगरपालिकेच्या कंत्राटी घंटागाडी कामगारांनी मंगळवारी सकाळी अचानक कामबंद आंदोलन पुकारले. त्यामुळे झोन क्रमांक १, २ आणि ३ मधील कचरा संकलन काही काळ ठप्प झाले. मात्र सुमारे तासाभरात संबंधित मक्तेदारांनी कामगारांशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून सर्व कामगार पुन्हा कामावर रुजू झाले.
कोणतेही स्पष्ट कारण न देता दरमहा ५०० ते ५ हजार रुपयांपर्यंत पगार कपात केली जाते. तसेच पगारातून पीएफ आणि ईएसआयची रक्कम कपात होत असली तरी अनेकांना ईएसआय कार्ड मिळालेले नाही. दरमहा हजेरीपत्रक जाहीर करून १० तारखेपर्यंत संपूर्ण पगार बँक खात्यात जमा करावा.शहरातील अनेक घंटागाड्या नादुरुस्त असून फाटलेले टप, झिजलेले टायर, निकामी लाईट व वायपर तसेच खराब डंपिंग यंत्रणेमुळे अपघाताचा धोका वाढल्याचा दावा कामगारांनी केला. पावसाळ्यात रेनकोट, हातमोजे व दर्जेदार गमबूट उपलब्ध करून द्यावेत, तसेच कचऱ्याच्या वजनाच्या अटीत सुधारणा करावी, अशीही मागणी करण्यात आली.
महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेत सोलापुरातील कंत्राटी घंटागाडी कामगारांना कमी वेतन मिळत असल्याचा आरोप करत किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी आणि महिन्याला चार भरपगारी सुट्ट्या देण्याची मागणीही त्यांनी केली.कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले असून तीनही झोनमधील कचरा संकलनाची सेवा पूर्ववत सुरू झाली आहे.
एक -दोन-तीन झोन अतर्गत असलेल्या घंटागाडी वरील कामगारांनी आज सकाळी अचानक काम बंद केले होते मात्र संबंधित मक्तेदाराने त्यांच्याशी चर्चा केली. चर्चेअंती तासाभरात अखेर संबंधित कामगार पूर्ववत कामावर गेले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे यांनी दिली.
Post Views: 5