बार्शी – स्वतःला श्रीराम फायनान्सचे रिकव्हरी एजंट असल्याचे सांगून मोटरसायकलस्वारांना लुटणाऱ्या टोळीचा बार्शी तालुका पोलिसांनी अवघ्या २ तासात पर्दाफाश केला आहे. तक्रारदार महेश नरहरी चव्हाण रा. बाभूळगाव, ता. पंढरपूर हे लातूरहून येरमाळ्याकडे जात असताना बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीतील कुसळंब गावाजवळ दोन अज्ञातांनी त्यांच्या मोटरसायकलला धडक मारुन खाली पाडले. आरोपींनी आम्ही श्रीराम फायनान्सचे लोक आहोत. मोटरसायकलचे हप्ते का थकवले? आत्ताच्या आत्ता ५० हजार रुपये दे, नाहीतर गाडी घेऊन जाऊ, असे म्हणत शिवीगाळ केली. फिर्यादी यांनी गाडी भावाच्या कामगाराची असल्याचे सांगून फोन करतो, असे म्हटल्यावर आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली. जवळील दगडाने डोक्यात मारण्याची धमकी देऊन खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. तसेच मोबाईल फोडून नुकसान करुन आरोपी पळून गेले. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात रॉबरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. आरोपींनी वापरलेल्या मोटरसायकल क्रमांकावरुन गुन्हे शोध पथकाने अवघ्या २ तासात दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वापरले वाहन आणि मारहाण करुन लुटलेली रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी ऋषिकेश सुनील साठे, रा. भवानी पेठ, बार्शी व मुजम्मिल रियाज सय्यद, रा. मंगळवार पेठ, बार्शी. दोन्ही आरोपींना आज न्यायालयात पोलीस रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब शिरगिरे करीत आहेत.
बार्शी तालुका पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा पद्धतीने रिकव्हरी एजंट सांगून ज्यांच्याकडून पैसे घेतले असतील किंवा फसवणूक झाली असेल त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. या टोळीने आणखी गुन्हे केले असण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षकअक्षय सोनवणे, पीएसआय कुलदीप सोनटक्के, पीएसआय आबासाहेब शिरगिरे, राजेंद्र मंगरुळे, युवराज गायकवाड, सिद्धेश्वर लोंढे, गणेश साठे, आकाश कांबळे, सतुल बाकले, मारुती शेलार यांनी केली.