सोलापूर : कल्पकता, कौशल्य आणि आत्मविश्वासाला उद्योजकतेची दिशा मिळाली तर सामान्य हातही असामान्य भविष्य घडवू शकतात. याच विचाराची प्रचिती सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात आयोजित फॅशन डिझाईन कोर्सच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात आली. यावेळी स्व. जयकुमारजी पाटील कौशल्य विकास केंद्रातील यशस्वी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे होते. डॉ. देवराव मुंडे, प्रशिक्षक आफरीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रशिक्षक आफरीन शेख यांनी फॅशन डिझायनिंगमधील संधींबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, फॅशन बदलत राहते; मात्र कुशल हातांना असणारी मागणी कधीच कमी होत नाही. या क्षेत्रातून स्वतःचा व्यवसाय उभारत स्वतंत्र ओळखही निर्माण करता येते. यातून घराची जबाबदारी सांभाळूनही महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळविता येते.
डॉ. देवराव मुंडे म्हणाले, कौशल्य ही रोजगारासोबतच स्वतःवर विश्वास ठेवण्याची ताकदही देतात. शिकलेल्या कौशल्याचा प्रत्यक्ष व्यवसायात उपयोग करून प्रशिक्षणार्थींनी स्वतःची ओळख निर्माण करावी.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, स्वतःच्या कर्तृत्वावर आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण होणे, हेच खरे सक्षमीकरण आहे. कौशल्य हे त्यासाठीचे सर्वात प्रभावी साधन आहे. फॅशन डिझायनिंगमधील प्रशिक्षणाचा उपयोग केवळ नोकरी मिळविण्यासाठी न करता विद्यार्थिनींनी स्वतःचे बुटीक, डिझाईन स्टुडिओ, लघुउद्योग उभारण्याचे स्वप्न पाहावे. रोजगाराच्या रांगेत उभे राहण्याऐवजी इतरांच्या हाताला काम देणाऱ्या उद्योजिका बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगावी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रदीप जगताप यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सुकेशिनी कांबळे यांनी केले, तर प्रा. दीपाली सातपुते यांनी आभार मानले. यावेळी प्रा. निलोफर तांबोळी, डॉ. संतोष मारकवाड, प्रा. ऐश्वर्या मेटे, प्रा. अमृता उदगिरी आदी उपस्थित होते.
*फोटो ओळ : प्रशिक्षणार्थीं विद्यार्थिनींसमवेत प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, डॉ. देवराव मुंडे, प्रशिक्षक आफरीन शेख, प्रा. निलोफर तांबोळी, प्रा. दीपाली सातपुते*
*चौकटीतील मजकूर*
*गृहिणींसाठीही स्वप्नांना ‘दुसरी संधी’*
यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे म्हणाले की, हा कोर्स केवळ महाविद्यालयीन विद्यार्थिनींपुरता मर्यादित नाही. गृहिणी तसेच विविध कारणांनी औपचारिक शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहिलेल्या महिलांनाही या कोर्समध्ये प्रवेश घेता येतो. त्यामुळे शिक्षण अर्धवट राहिले म्हणून करिअरची दारे बंद झाली, या समजुतीला हा उपक्रम छेद देत आहे. वय अथवा शैक्षणिक प्रवासातील खंड यापेक्षा शिकण्याची इच्छा आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द महत्त्वाची असल्याचा संदेश यातून दिला जात आहे.
Post Views: 9