करमाळा – करमाळा शहर आणि तालुका परिसरात सध्या कार आणि बाईक फायनान्स करणाऱ्या कंपन्यांच्या रिकव्हरी एजंट्सनी उच्छाद मांडला असून, थकीत हप्त्यांच्या नावाखाली सर्वसामान्य वाहनधारकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट आणि पिळवणूक सुरू आहे. गाडी जप्त करण्याची धमकी देऊन ग्राहकांकडून हजारो रुपये उकळले जात असून, या मागे नेमका कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
बोगस पावत्या आणि कमिशनचा गोरखधंदा
मिळालेल्या माहितीनुसार, एखादा हप्ता चुकला किंवा उशीर झाला की हे रिकव्हरी एजंट ग्राहकांना गाठतात. त्यानंतर हप्त्याच्या रक्कमेव्यतिरिक्त एका गाडीमागे १० ते १५ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी केली जाते. विशेष म्हणजे, यासाठी ग्राहकांना बोगस पावत्या दिल्या जातात किंवा पावती देण्यास साफ नकार दिला जातो.
जेव्हा एखादा सजग ग्राहक या अतिरिक्त पैशांची पावती मागतो, तेव्हा त्याला “हे पैसे तुझ्या गाडीचा हप्ता नसून, तुझी गाडी सोडण्याचे आहेत. हे आमचे कमिशन आणि गाडी ओढून आणल्याचा खर्च (सीझिंग चार्जेस) आहे,” असे उद्धटपणे सांगितले जाते. एवढेच नव्हे तर, “जास्त बोलू नको, इथून चालता हो, नाहीतर पुन्हा गाडी जप्त करू,” अशा प्रकारची शिवीगाळ आणि धमकीची भाषा सर्रास वापरली जात आहे.
पोलीस प्रशासनाचा धाक उरला नाही का?
दिवसाढवळ्या रस्त्यावर किंवा ग्राहकांच्या घराबाहेर चालणाऱ्या या दादागिरीमुळे करमाळा तालुक्यात भीतीचे वातावरण आहे. कायद्याला धाब्यावर बसवून ग्राहकांना मानसिक त्रास देणाऱ्या या एजंट्सवर पोलीस प्रशासनाचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र दिसत आहे. रिकव्हरी संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट नियम असतानाही, गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर करून ग्राहकांना धमकावले जात आहे. यावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या ‘काळ्या धंद्या’मागे नेमका कोणता मोठा चेहरा?
सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या या रिकव्हरी एजंट्सचे धागेदोरे नेमके कुठे जोडलेले आहेत, याबद्दल तालुक्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता ही लूट सुरू असल्यामुळे, या टोळ्यांमागे करमाळ्यातील एखादा बडा राजकीय नेता किंवा वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे का? अशी शंका आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
गोरगरीब आणि मध्यमवर्गीय ग्राहकांना लुटणाऱ्या या बोगस रिकव्हरी एजंट्सचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि वसुलीच्या नावाखाली सुरू असलेली ही गुंडगिरी थांबवावी, अशी तीव्र मागणी करमाळा तालुक्यातील वाहनधारकांमधून केली जात आहे.
Post Views: 16