करकंब – करकंब येथील राजवीर बिअर शॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धाडस सामाजिक संघटनेचे तालुका युवाअध्यक्ष विजय नलवडे यांनी केली आहे.यासंदर्भात त्यांनी जिल्हा अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांना सविस्तर निवेदन दिले. निवेदनात करकंब येथील संबंधित बिअर शॉपीमध्ये नियमबाह्य पद्धतीने दारू विक्री होत असून, याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.तसेच बेकायदेशीररीत्या विक्री करण्यास बंदी असलेली दारू विकणे, अल्पवयीन मुलांना दारू विक्री होत असतानाचे फोटो व व्हिडिओ पुरावे सादर केल्याचा दावा करण्यात आला आहे.तक्रारदाराने पुढे आरोप केला आहे की सर्व पुरावे देऊनही संबंधित अधिकारी कारवाई करण्याचे टाळत असून वारंवार विचारणा करूनही अहवाल सादर करण्यात आलेला नाही.त्यामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.याशिवाय, गोपनीय माहिती दिल्यानंतर बिअर शॉपी चालकांकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.तुम्ही कुठेही जा आमचे काहीही बिघडणार नाही अशा प्रकारच्या भाषेत दबाव आणला जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकारामुळे तक्रारदाराच्या जीवितास धोका निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित निरीक्षक व उपनिरीक्षक यांना तात्काळ निलंबित करावे तसेच राजवीर बिअर शॉपीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करावाvअशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान वरील मागण्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय, पंढरपूर समोर ‘धरणे आंदोलन’ करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.आंदोलनादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Post Views: 16