सोलापूर : गणेश विसर्जनानंतर शहरातील मिरवणूक मार्गांवर साचलेला कचरा, निर्माल्य आणि गुलाल हटविण्यासाठी महापालिकेच्या सुमारे ३०० कर्मचाऱ्यांनी शनिवारी पहाटेपासून स्वच्छता मोहीम राबविली.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे यांच्या नियोजनानुसार शनिवारी पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत शहरातील नऊ मिरवणूक मार्गांची स्वच्छता करण्यात आली.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि भाविकांनी विसर्जित केलेल्या मूर्तींसाठी शहरात ११ विसर्जन कुंड ठेवण्यात आले होते. तसेच महापालिकेने निश्चित केलेल्या ४९ मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रांवर भाविकांनी मूर्ती सुपूर्द केल्या. या केंद्रांवर महापालिका कर्मचाऱ्यांनी मूर्ती आणि निर्माल्य संकलित केले.
स्वच्छतेसाठी मिरवणूक मार्ग, विसर्जन कुंड व मूर्ती संकलन केंद्रांच्या परिसरात सुमारे ३०० कर्मचारी, ५५ आरोग्य निरीक्षक आणि आठ मुख्य सफाई अधीक्षक तैनात करण्यात आले होते. मिरवणूक मार्गांवर साचलेले हार-फुले, पूजा साहित्य, प्लास्टिक व अन्य कचरा हटविण्यात आला. मोठ्या प्रमाणावर साचलेला गुलालही झाडलोट करून काढण्यात आला. त्यानंतर टँकरच्या सहाय्याने प्रमुख मार्ग पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले.
शहरातील गणपती घाट, विष्णू घाट यासह विविध विसर्जन कुंड परिसराचीही स्वच्छता करण्यात आली. विष्णू घाट परिसर टँकरच्या सहाय्याने धुवून घेण्यात आला. स्वच्छता मोहिमेसाठी ३० घंटागाड्या आणि चार रिफ्युज कॉम्पॅक्टर वापरण्यात आले, असे मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे यांनी सांगितले.
स्वच्छता मोहिमेची ठळक आकडेवारी
* मिरवणूक मार्गांच्या स्वच्छतेसाठी
महापालिकेचे ३०० कर्मचारी
* गणेश विसर्जन कुंड – ११
* मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्रे – ४९
* ५५ आरोग्य निरीक्षक , ८ मुख्य सफाई अधीक्षक तैनात
Post Views: 4