बार्शी – बारा दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी (दि. २५ सप्टेंबर) गणेश विसर्जनाने झाली. बार्शी शहरात पारंपरिक वाद्ये, ढोल-ताशा, ढोल पथक, लेझीम पथक आणि बँडच्या गजरात उत्साहपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या ‘नो डीजे, नो डॉल्बी’च्या आवाहनाला सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रतिसाद देत यंदाच्या विसर्जन मिरवणुका पारंपरिक पद्धतीने काढल्या.
विसर्जनाच्या दिवशी शहरातील सात सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका विविध मार्गांवरुन मार्गस्थ झाल्या. मिरवणुकांमध्ये तरुण-तरुणींसह लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत नागरिकांनी लेझीम आणि ढोल-ताशांच्या तालावर उत्स्फूर्त सहभाग घेतला. दरम्यान, ब्रिटिशकालीन आदेशानुसार विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी सतरावा पुट्टा गणपतीची मिरवणूक काढण्यात आली.
पर्यावरणपूरक विसर्जनासाठी बार्शी नगरपरिषदेने मुख्याधिकारी तैमुर मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली शहरात घरगुती गणपतीचे दहा ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. तसेच गणेश तलावाजवळ घरगुती व सार्वजनिक गणपतींच्या विसर्जनासाठी पर्यावरण पूरक कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. नागरिकांनी या उपक्रमाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस अधिकारी, अंमलदार, होमगार्ड मिरवणूक मार्ग व विसर्जन स्थळांसह शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी तैनात होते. सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांनी विसर्जनस्थळी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.
नगरपरिषद, पोलीस प्रशासन, गणेश मंडळे आणि नागरिकांच्या समन्वयामुळे गणेश विसर्जन शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. ‘नो डीजे, नो डॉल्बी, नो लेझर शो’ तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाच्या संकल्पनेला बार्शीकरांनी दिलेली साथ यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.