बार्शी – बार्शी शहर पोलिसांनी राबविलेल्या कॉम्बिंग ऑपरेशनदरम्यान सुभाषनगर परिसरात पिस्टल, चाकू आणि तलवारीसह एका संशयितास ताब्यात घेतले. सचिन कुमार मिरगणे (वय ३८, रा. सुभाषनगर, बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून शस्त्रांसह स्विफ्ट डिझायर कार असा एकूण ५ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ११ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १२ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजेपर्यंत कॉम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस पथक नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशन करीत असताना मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास हिरेमठ हॉस्पिटल, सुभाषनगर परिसरात सचिन मिरगणे हा कमरेला पिस्टल लावून वाहनात बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहितीची पडताळणी करुन पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी धाव घेतली. मध्यरात्री दोनच्या सुमारास तेथे गजग्या रंगाची स्विफ्ट डिझायर कार आढळली. पोलिसांना पाहताच कारमधील दोनजण पळून गेले. पोलिसांनी कारमध्ये असलेल्या सचिन मिरगणे याला ताब्यात घेतले.
पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचा धारदार चाकू जप्त करण्यात आला. कारच्या मागील सीटवरुन चार हजार रुपये किमतीची ३३ इंच पात्याची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. तसेच पाच लाख रुपये किमतीची स्विफ्ट डिझायर कार पोलिसांनी जप्त केली.
पिस्टल बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता आरोपीने परवाना नसल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्याच्यासोबत असलेले राहुल अनभुले व दत्ता उंदरे हे दोघे पळून गेले असून, जप्त केलेली तलवार दत्ता उंदरे याची असल्याचे सचिन मिरगणे याने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याप्रकरणी तिघांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, ४, २५, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ तसेच भारतीय न्यायसंहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी सचिन मिरगणे याला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला सोमवार, १७ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. फरार झालेल्या दोन्ही संशयितांचा शोध सुरु असून, जप्त केलेली शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
Post Views: 19