धमक्या देऊन लोखंडी रॉडने मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश दांपत्याला आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात न बोलण्यासाठी धमकावण्यात आले. तसेच “जय लहुजी, जय अण्णा” अशा घोषणा देण्यास जबरदस्ती करण्यात आली. या जबरदस्तीला विरोध केला असता नितीन शहाजी देडे, आतिश मधुकर देडे, बबलू युवराज कांबळे आणि प्रेम बल्लाळ यांनी विकास व रेखा अंकुश यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या :
निष्पक्ष चौकशी व कठोर गुन्हे : पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, प्रत्यक्षदर्शींचे पुरावे आणि उपलब्ध व्हिडिओंच्या आधारे घटनेची सखोल व निष्पक्ष चौकशी करून आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत.
पारदर्शक कारवाई : कोणत्याही राजकीय किंवा सामाजिक प्रभावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शकपणे पावले उचलावीत.
तत्काळ पोलीस संरक्षण : पीडित अंकुश दांपत्याच्या जीवितास गंभीर धोका असल्याने प्रशासनाने त्यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवावे.
तीव्र आंदोलनाचा इशारा
संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. वैचारिक मतभेदांमधून हिंसाचार करणे हे लोकशाहीला घातक असून, प्रशासनाने या प्रकरणात टाळाटाळ किंवा दिरंगाई केल्यास धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे मा .जिल्हा संघटक विकास बनसोडे,आरपीआय(खरात) जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव भाई फूलचंद गायकवाड (पाटील) आरपीआय (आठवले) जिल्हाउपाध्यक्ष संदिपान कांबळे,बापूराव गायकवाड, नेताजी लोंढे, उमाजी गायकवाड, अण्णाराव कांबळे, बळीराम बनसोडे व शिवदर्शन गव्हाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत




















