मंगळवेढा – श्री संत दामाजी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमेच्या मागणीसाठी १५ ऑगस्टपासून सुरू झालेले धरणे आंदोलन आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.
आंदोलनाला तब्बल तीन दिवस उलटूनही कारखाना प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वर्षानुवर्षे कारखान्यासाठी घाम गाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या थकीत रक्कमेसाठी स्वातंत्र्यादिवशी आंदोलन छेडावे लागले.
दुर्दैवाची बाब म्हणजे, तीन दिवस उलटूनही कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळातील सदस्य किंवा कार्यकारी संचालक यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन साधी विचारपूस करण्याचीही तसदी घेतलेली नाही. प्रशासनाच्या या बेफिकीर वृत्तीमुळे कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
प्रशासनाला शेवटचा अल्टीमेटम दिला असुन मंगळवारी ५ वाजेपर्यंत चर्चेला या, अन्यथा…
प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेला उत्तर देण्यासाठी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. पत्रकाद्वारे कारखान्याला इशारा देण्यात आला आहे की
मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत प्रशासनाने चर्चेसाठी यावे.
विहित वेळेत तोडगा न निघाल्यास, बुधवार दिनांक १९ ऑगस्टपासून ‘कारखाना गेट बंद’ आणि ‘कार्यालय बंद’ आंदोलन पुकारले जाईल.
या आंदोलनाची गंभीरता लक्षात घेता, ३८ ते ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मंगळवेढा पोलीस स्टेशन आणि तहसीलदार मंगळवेढा यांना सादर करण्यात आले आहे.
आपल्या आयुष्याची उमेदीची वर्षे कारखान्यासाठी देणाऱ्या या वृद्धांना आता हक्काच्या पैशांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असल्याने संपूर्ण मंगळवेढा तालुक्यातून हळहळ आणि प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.
आता मंगळवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासन काय भूमिका घेते, की १९ ऑगस्टला कारखान्याला टाळे ठोकले जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Post Views: 4