सोलापूर : महापालिका सर्वसाधारण सभेची दिशाभूल केल्याबद्दल महापालिकेच्या प्रभारी नगरअभियंता सारिका आकुलवार यांची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनंत जाधव यांनी केली आहे
याबाबत नगरसेवक अनंत जाधव यांनी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दि. २०/०७/२०२६ च्या महापालिका सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही लक्षवेधीमध्ये नालेसफाईच्या बिलामध्ये अनियमितता असल्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. यावर प्र. नगर अभियंता सारिका आकुलवार यांनी सभागृहामध्ये बिलांमधील एक रुपया देखील जादा अदा केले नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. यावर आयुक्त यांना विचारले असता त्यांनी सभागृहात सदर बिलांबाबत अनियमतात झाल्याचे कबुल करीत याबाबत चौकशी करू असे सांगितले.
यासंदर्भात आयुक्त यांनी चौकशी केली असता यामध्ये जवळपास ८४ लाखांची बिले जादा गेल्याचे आढळून आलेले आहे. प्र. नगरअभियंता सारिका आकुलवार यांनी सभागृहात खोटे सांगितलेले आहे, चुकीची माहिती देऊन त्यांनी सभागृहाची दिशाभूल केली आहे.
सभागृहाची दिशाभूल करणे तसेच महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान करणे अशा गंभीर स्वरुपाचा गुन्हा त्यांच्याकडून घडलेला आहे. त्यामुळे प्र. नगर अभियंता सारिका आकुलवार यांच्यावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ५६ नुसार कारवाई करण्यात यावी. ही कारवाई करताना सक्षम अधिकाऱ्याची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात यावी, असे निवेदनात नमूद आहे.