बार्शी – नागपंचमीनिमित्त येथील टिळक चौकातील नागोबा मंदिर आणि मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. नागपंचमीनिमित्त येथे जत्रा भरते. बार्शी शहराची वेगळी ओळख असलेली ही एकमेव जत्रा यंदाही उत्साहात पार पडली. सकाळपासूनच नागोबा मंदिरात नागदेवतेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक तसेच बालकांनी मंदिरात दर्शन घेऊन नागोबाला दूध, फुले, हार व नैवेद्य अर्पण करुन पूजा-अर्चा केली. दिवसभर मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण होते.
नागपंचमीनिमित्त मंदिर परिसरात भरलेल्या जत्रेत विविध दुकाने थाटण्यात आली होती. भव्य आकाश पाळणे, चक्री पाळणे, तसेच लहान मुलांसाठीची विविध खेळणी विशेष आकर्षण ठरली. गृहोपयोगी वस्तू, खेळणी, पूजेचे साहित्य, कपडे, मिठाई आणि विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल जत्रेत सजले होते. त्यामुळे टिळक चौक परिसरात दिवसभर नागरिकांची वर्दळ कायम होती.
नागपंचमीनिमित्त भरणाऱ्या या जत्रेला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. बार्शी शहरासह तालुक्यातील ही जत्रा केवळ धार्मिक श्रद्धेपुरती मर्यादित न राहता बार्शीच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. बदलत्या काळात जत्रेचे स्वरुप बदलत असले तरी नागोबा मंदिरातील दर्शन आणि जत्रेला भेट देण्याची परंपरा आजही कायम आहे. पोलिसांकडून आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Post Views: 13