बार्शी – तालुक्यातील शेंद्री येथे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाचे लॉक तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज चोरून नेल्याची घटना १३ ते १४ ऑगस्ट दरम्यान घडली.
याप्रकरणी शहाजी अरुण चव्हाण (वय ३४, रा. शेंद्री, ता. बार्शी) यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजल्यापासून १४ ऑगस्ट रोजी पहाटे २ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चव्हाण यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश केल्यानंतर लॉक असलेल्या कपाटाचेही कुलूप तोडून त्यातील सोन्याचे दागिने व चांदीच्या वस्तू चोरून नेल्या.
चोरीस गेलेल्या ऐवजात पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, सव्वादोन ग्रॅमची सोन्याची अंगठी, साडेपाच ग्रॅमचे सोन्याचे गंठण, दीड ग्रॅमची सोन्याची फुले, दोन सोन्याच्या नथी, अर्धा ग्रॅमची सोन्याची रिंग, सव्वातीन ग्रॅमची सोन्याची ठुशी तसेच एक भार वजनाचा चांदीचा करंडा या ऐवजाचा समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची नोंद पोहेकॉ/१७५ खांडेकर यांनी केली असून, गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे करीत आहेत. अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Post Views: 5