बार्शी – येथील प्राथमिक विद्यामंदिर व शेठ अगरचंद कुंकुळोळ प्रशाला (न्यू हायस्कूल) येथून शिक्षणाची सुरुवात केलेल्या आकाश देवेंद्र अतनूरकर यांची अमेरिकेतील प्रतिष्ठित Michigan State University (मिशिगन स्टेट विद्यापीठ) येथे Civil and Environmental Engineering (नागरी व पर्यावरण अभियांत्रिकी) विषयातील Ph.D. (डॉक्टरेट) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे.
त्यांचे विशेष संशोधन क्षेत्र Water Resources Engineering (जलस्रोत अभियांत्रिकी) असून जलस्रोत, मृदा आर्द्रता, दुष्काळ निरीक्षण व उपग्रह-आधारित संशोधनावर ते काम करणार आहेत.
आकाश यांनी ITI – Mechanic Motor Vehicle (मोटार वाहन यांत्रिकी), Mechanical Engineering (यांत्रिक अभियांत्रिकी) मधील पदविका आणि पुढे B.E. (अभियांत्रिकी पदवी) पूर्ण केली. त्यानंतर IIT Bhubaneswar (भारतीय तंत्रज्ञान संस्था, भुवनेश्वर) येथे संशोधन करताना मृदा आर्द्रता, जलस्रोत, कृषी व दुष्काळ निरीक्षणावर काम केले.
या संशोधनासाठी Remote Sensing (दूरसंवेदन), GIS (भौगोलिक माहिती प्रणाली), Machine Learning (यंत्राधारित अध्ययन), MATLAB व Python तसेच विविध उपग्रहांच्या माहितीचा वापर केला. त्यांच्या संशोधनाचे शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत.
या उल्लेखनीय यशाबद्दल अगरचंद कुंकुळोळ प्रशालेतर्फे संचालक रावसाहेब मनगिरे यांच्या हस्ते आकाश अतनूरकर यांचा सत्कार करण्यात आला. ज्या शाळेतून त्यांच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली, त्याच शाळेत सत्कार होणे हा अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण असल्याचे आकाश यांनी सांगितले.
बार्शीच्या मातीतून अमेरिकेतील विद्यापीठापर्यंत पोहोचलेला आकाश अतनूरकर यांचा हा प्रेरणादायी प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच आदर्श ठरणारा आहे.
Post Views: 13