तुंगत : पाटकुल ग्रामपंचायतीसमोरील विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दोन दिवस बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत लेखी स्वरूपात ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
पाटकुल परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या काही काळापासून प्रलंबित आहे. जल जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत आष्टी तलावातून पेनूर-पाटकुल येथील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची योजना रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी प्रभाकर भैय्या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान जीवन प्राधिकरण योजनेचे उपकार्यकारी अभियंता संदीप देशपांडे तसेच पाटकुल ग्रामसेविका भानवसे यांनी आंदोलकांशी चर्चा केली. संबंधित मागण्यांची दखल घेऊन प्रलंबित कामे पूर्ण करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.
आष्टी तलावातून पेनूर-पाटकुलला पिण्याच्या पाण्याची योजना कार्यान्वित करण्यासाठी महावितरणशी संबंधित राहिलेले काम एका महिन्याच्या आत पूर्ण करून योजना मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे पाटकुलच्या पाणीप्रश्नाला आता गती मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे.
लेखी आश्वासन मिळाल्यानंतर प्रभाकर भैय्या देशमुख यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, दिलेल्या आश्वासनाची मुदतीत अंमलबजावणी झाली नाही तर पुढील काळात पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला.
या आंदोलनात पाटकुल ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश नामदे, ग्रामपंचायत सदस्य ज्योतीराम काटे, अरविंद काळे, किरण वसेकर, रेखा लोंढे, सुनील सुतार, युवराज पवार, रूपाली गोडाळे यांच्यासह ग्रामस्थ शंकर नामदे, बारीकराव काळे, दत्ता शिंदे, शिवाजी धोत्रे, काका वाघमोडे, बंडू लोखंडे, नवनाथ सातपुते, पप्पू लोखंडे, शिवाजी लोंढे, सोमनाथ भैय्या लोंढे, वैभव काटे, विकास काटे, किसन काका लोंढे, चेतन लोंढे, जितेंद्र लोंढे, बाळासाहेब ऐवळे तसेच पाटकुलमधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
चौकट…..
पाटकुलच्या नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने छेडलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाला अखेर दखल घ्यावी लागली आहे. आता लेखी आश्वासनानुसार महिनाभरात काम पूर्ण होऊन पेनूर-पाटकुलच्या नागरिकांना आष्टी तलावातून पिण्याचे पाणी मिळणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 9