बार्शी – श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथील कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला बार्शीचे नायब तहसीलदार डॉ. रविंद्र सानप यांनी सदिच्छा भेट देऊन केंद्राच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्य विद्यार्थीकेंद्रीत व विकासाभिभुख असल्याचे मत रविंद्र सानप त्यांनी व्यक्त केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. राहुल पालके उपस्थित होते. डॉ. सानप यांनी केंद्रामार्फत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली.
कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत विषयतज्ज्ञ प्राध्यापकांकडून विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीसाठी नियमित सराव परीक्षा घेण्यात येतात. तसेच केंद्रामध्ये सुसज्ज रिडिंग लायब्ररीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचे शंका निरसन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच मुलाखतीचे मार्गदर्शन तज्ज्ञांकडून केले जाते.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन, योग्य नियोजन आणि अद्ययावत अभ्यास साहित्य उपलब्ध करुन देणे ही काळाची गरज असल्याचे डॉ. रविंद्र सानप यांनी यावेळी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून सातत्याने अभ्यास करावा, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
यानंतर डॉ. सानप यांनी इंग्रजी विभागालाही भेट दिली. याप्रसंगी विभाग प्रमुख डॉ. एस. डी. पवार व डॉ. एस. सी. माने उपस्थित होते. विभागातील शैक्षणिक उपक्रम, विद्यार्थ्यांना दिले जाणारे मार्गदर्शन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांविषयी त्यांनी माहिती घेतली.
प्राचार्य डॉ. ए. बी. शेख यांनी महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली, तर डॉ. राहुल पालके यांनी कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली.
Post Views: 3