सांगोला – देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व सांगोला विद्यामंदिर अमृत महोत्सवी वर्ष २०२६-२७ निमित्त ‘सैनिक रक्षाबंधन व शौर्य सन्मान’ हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भारतीय माजी सैनिक संघटना सोलापूरचे अध्यक्ष अरुणकुमार तळीखेडे, संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, प्राचार्य चारुदत्त जगताप, ड्रीम फाऊंडेशनचे काशिनाथ भतगुणकी, करांडे इंटरनॅशनल स्कूलचे श्रीधर करांडे, सांगोल्यातील माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब साळुंखे, जय जवान माजी सैनिक सेवाभाव संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील, उपाध्यक्ष रविकांत मराळ, तसेच चिणके, राजापूर, सोनंद जवळा, मानेगाव, मंगळवेढा, वासुद, अकोला, कडलास मानेगाव बुद्रुक, कोळा या गावातील माजी सैनिक संघटना अध्यक्ष उपस्थित होते.
सन्मान सोहळ्याच्या सुरुवातीला कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर एनसीसी कॅडेटने माजी सैनिकांना मानवंदना दिली. प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी प्रास्ताविकात मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी याच हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले. मनोगतात काशीनाथ भतगुणकी यांनी विद्यार्थ्यांना माजी सैनिकांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. अरुणकुमार तळीखेडे यांनी देशाला संरक्षण दृष्ट्या बलशाही करण्यासाठी सैनिक कार्य करत असतात, त्यामुळे सैनिकांविषयी आणि जन्म देणाऱ्या आई-वडिलांविषयी नेहमी आदर बाळगा, मोबाईलपासून दूर राहा आणि वाचन संस्कृती वाढवा, असा सल्ला देत आयोजनाबद्दल संस्थेचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी तर आभार
प्रा.चारूदत्त जगताप यांनी मानले.
चौकट-
संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ सैनिकांना सन्मानित करण्याचा संस्थेचा संकल्प होता. मात्र, या उपक्रमाला साद देत तब्बल ८९ माजी सैनिक या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले. सीमेवर ऊन-पावसाची तमा न बाळगता रक्षण करणाऱ्या या शूरवीर भावांच्या मनगटावर जेव्हा सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेजच्या विद्यार्थिनींनी कृतज्ञतेची राखी बांधली आणि सन्मानचिन्ह दिले तेव्हा संपूर्ण सभागृह भारावून गेले. या वीर जवानांनीही बहिणीच्या नात्याने सर्व विद्यार्थिनींना शालेय साहित्याची भेटवस्तू देऊन त्यांच्या पाठीवर वात्सल्याची थाप दिली. डोळ्यांच्या कडा ओलावणारा आणि देशाच्या खऱ्या अनमोल हिऱ्यांचा गौरव करणारा हा प्रसंग सर्वांच्याच कायम स्मरणात राहणारा ठरला.
Post Views: 24