सोलापूर : भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असलेला रक्षाबंधन सोहळा यंदा सोलापूर येथील माईर्स एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा केला. समाजातील प्रत्येक घटकाला समानतेने आणि आपुलकीने सामावून घेण्याचा संदेश देत, गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ‘राधाकृष्ण फोमरा मूक-बधिर विद्यालया’तील विशेष मुलांसोबत रक्षाबंधनाचा आनंद द्विगुणित केला. माईर्स एमआयटी संस्थेच्या विश्वस्त व महासचिव प्रा. स्वाती कराड-चाटे यांच्या प्रेरणेतून आयोजित या उपक्रमाचा उद्देश
विद्यार्थ्यांमध्ये परस्पर स्नेह, सहानुभूती आणि सर्वसमावेशकतेची भावना वृद्धिंगत करणे हा होता.
रक्षाबंधनानिमित्त गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी मूक-बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रेमाची राखी बांधून त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवले. कोणत्याही संवादाची किंवा शब्दांची गरज न भासता, केवळ भावनांच्या रेशमी धाग्याने दोन्ही विद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये स्नेहाचे आणि आपुलकीचे बंध अधिक दृढ केले.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रुपाली हजारे यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांना संवेदनशील, जबाबदार आणि सामाजिक भान असलेले उत्तम नागरिक घडवणे ही आपली जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या मनात समाजातील प्रत्येक घटकाविषयी आदर व आपुलकीची भावना निर्माण होते.”
Post Views: 20