सोलापूर – सोलापूरचे भूमिपुत्र असलेल्या 108 श्री सुप्रभसागर महाराज यांच्या घोर तपसाधना, विशिष्ट प्रवचन शैली, अनेक भाषांवर प्रभुत्व आणि साहित्याची निर्मिती केली, असे गौरवोद्गार जैन विद्वानांनी काढले.
सोलापूरच्या पवित्र भूमीत आज एका ऐतिहासिक सोहळ्याची नोंद होत आहे. श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट आणि श्री महावीर सांस्कृतिक भवन यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील जैन विद्वानांचे दोन दिवसीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले. ‘प.पू. पट्टाचार्य श्री विशुद्ध सागर जी गुरु परंपरा’ या अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी विषयावर आयोजित या सत्रात देशभरातून आलेल्या नामवंत जैन विद्वानांचा सहभाग लाभला आहे.
‘पट्ट’ (विशेष जबाबदारी स्वीकारणारा उत्तराधिकारी) आणि ‘आचार्य’ या संकल्पनांवर प्रकाश टाकताना, आचार्य हे जैन आगम दर्शन, अध्यात्म परंपरा आणि शिस्तीचे पालन करत समाजाला कसे मार्गदर्शन करतात, याबाबत या चर्चासत्रात सखोल मंथन झाले. सोलापूरचे भूमिपुत्र परमपूज्य 108 श्री सुप्रभ सागर जी महाराज यांनी आपल्या प्रवचनात सोलापूरच्या गौरवशाली ऐतिहासिक वारशाचा विशेष उल्लेख केला. ब्रिटिशांविरुद्ध हौतात्म्य पत्करणारे श्री मोतीचंद आणि करमाळ्याचे दिगंबर मुनी आचार्य समंतभद्र महाराज बनलेले देवचंद यांचा इतिहास त्यांनी समोर आणला, तसेच सोलापुरातील प्राचीन ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
भारतातील विविध विद्यापीठांमधून प्राकृत आणि जैन तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक या चर्चासत्रात सहभागी झाले होते. प्रमुख विद्वानांमध्ये डॉ. श्रेयांस जैन (वडौत), डॉ. सुनील जैन संचय (ललितपुर), डॉ. नरेंद्र कुमार (टिकमगड), पीयूष जैन (विदिशा), ब्र. पंकज जैन (इंदोर), डॉ. ममता जैन (पुणे) आणि पं. राजकुमार आळंदकर (सोलापूर) यांचा समावेश होता.
याच कार्यक्रमादरम्यान डॉ. सुनील जैन संचय (ललितपुर) यांच्या ‘अंतर्मन का आलोक’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. सोबतच, अक्कलकोट येथे चार एकर जमीन जैन मंदिरासाठी दान करून २९ फूट उंच मुनिसुव्रत भगवानाची भव्य मूर्ती उभारण्याचा प्रेरणादायी संकल्प धर्मांनुरागी श्री राहुल आळंद यांनी व्यक्त केला.
सोलापूर मातृभूमी पावस योग समिती आणि श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर ट्रस्टच्या वतीने या कार्यक्रमाचे अत्यंत उत्कृष्ट आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रातील सर्व सत्रांचे संकलन करून लवकरच ‘राज जैन ग्रंथमाला’ सोलापूर तर्फे श्री संतोष शहा यांच्या द्वारे पुस्तक रूपात प्रकाशित केले जाणार आहे. या बौद्धिक आणि आध्यात्मिक सोहळ्याने सोलापूरच्या सांस्कृतिक समृद्धीत एक सुवर्णपान जोडले गेले.
——-






















