सोलापूर : सोलापूरकरांच्या प्रतीक्षेतील पीएम ई-बस सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हे आहेत. २० ई-बस शहरात दाखल झाल्या असून चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, चार्जिंग पॉइंटचा करार पूर्ण झाल्यानंतरच या बसेस सोलापूरच्या रस्त्यांवर धावणार आहेत.
सोलापूरकरांच्या प्रतीक्षेतील पीएम ई-बस सेवा सुरू होण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडत आहेत. पहिल्या टप्प्यात सोलापूर महानगरपालिकेला २० ई-बस मिळाल्या असून त्या सध्या डोणगाव रोडवरील एक्झिबिशन सेंटर परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळावर उभारण्यात येत असलेले चार्जिंग स्टेशन अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, ई-बस संचालनासाठी जेबीएम कंपनीसोबत होणारा करार अद्याप पूर्ण न झाल्याने या बस प्रत्यक्ष रस्त्यावर धावण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पीएम ई-बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र शासनाने सोलापूरसाठी पहिल्या टप्प्यात २० इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून दिल्या आहेत. या बसच्या संचालनासाठी सोलापूर महानगरपालिका आणि शासन नियुक्त जेबीएम प्रा. लि., नवी दिल्ली यांच्यात करार होणे आवश्यक आहे. करारातील अटी-शर्ती निश्चित झाल्यानंतरच ई-बस सेवा प्रत्यक्ष सुरू होणार आहे.ई-बससाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे मात्र वेगाने सुरू असून ती आता पूर्णत्वाकडे पोहोचली आहेत.
वाहनतळासाठी आवश्यक असलेली ३३ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी, ५ हजार केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा, चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा, प्रशासकीय इमारत तसेच वॉशिंग एरिया उभारण्याची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. उपकेंद्र उभारणी आणि केबल टाकण्याची कामेही पूर्ण झाली असून चार्जिंग स्टेशन येत्या चार-पाच दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
टी.पी. क्रमांक २, न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे बांधकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच ‘बिहाइंड द मीटर’ (बीटीएम) वीज पायाभूत सुविधांची तब्बल ९५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे कराराची प्रक्रिया पूर्ण होताच चार्जिंग पॉइंट कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
केंद्र शासनाने ई-बस संचालनासाठी नियुक्त केलेल्या जेबीएम कंपनीकडे बसचे संचालन, देखभाल-दुरुस्ती, चालकांची नियुक्ती, मनुष्यबळ व्यवस्थापन तसेच इतर आवश्यक खर्चाची जबाबदारी असणार आहे. महापालिकेची भूमिका आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची असून, कंपनीसोबतचा करार झाल्यानंतर प्रत्यक्ष बससेवेचे नियोजन निश्चित होईल.
एकीकडे २० अत्याधुनिक ई-बस सोलापुरात दाखल झाल्या आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या चार्जिंगसाठी आवश्यक सुविधा अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे आता सोलापूरकरांचे लक्ष महापालिका आणि जेबीएम कंपनीतील कराराकडे लागले आहे.
पायाभूत सुविधा सज्ज
– पहिल्या टप्प्यात सोलापूरला २० ई-बस
– न्यू बुधवार पेठेतील वाहनतळाचे ९० टक्के काम पूर्ण
– बीटीएम वीज पायाभूत सुविधांचे ९५ टक्के काम पूर्ण
– ३३ केव्ही वीजवाहिनीची सुविधा
– ५ हजार केव्हीए क्षमतेची वीज यंत्रणा
– चार्जिंग स्टेशन, कार्यशाळा आणि वॉशिंग एरियाची उभारणी अंतिम टप्प्यात
– कंपनीसोबत करारानंतर सुरू होणार प्रत्यक्ष संचालन
Post Views: 13