सोलापूर : शहरातील महिलांमध्ये कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करणे, आजाराचे वेळेत निदान होण्यासाठी तपासणी शिबिरे आयोजित करणे आणि आरोग्याविषयीची उदासीनता दूर करण्यासाठी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर शहरात कॅन्सर निदान व जनजागृती शिबिरांचे नियोजन करण्यात येणार असून, याबाबत इंडियन कॅन्सर सोसायटीच्या डॉक्टरांसमवेत प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे.
उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी इंडियन कॅन्सर सोसायटी, ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या अध्यक्ष डॉ. सरिता कोठाडिया यांच्यासह प्रतिनिधींशी प्राथमिक चर्चा केली.
प्राथमिक चर्चेनंतर आवश्यकतेनुसार सविस्तर नियोजन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल.शहरातील विविध भागांमध्ये महिलांसाठी कॅन्सरविषयक जनजागृती कार्यक्रम आणि निदान शिबिरे घेण्याचा विचार आहे,अशी माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली.
सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणावर कष्टकरी महिला वास्तव्यास आहेत. घर, कुटुंब आणि दैनंदिन कामकाजाच्या धावपळीत अनेक महिलांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. नियमित आरोग्य तपासणी न करणे, शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष करणे आणि आजाराची लक्षणे दिसूनही वैद्यकीय सल्ला घेण्यास उशीर होणे, ही बाब चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिरे आयोजित करण्याचा विचार असल्याचे उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी सांगितले.
इंडियन कॅन्सर सोसायटीच्या माध्यमातून कॅन्सरची प्राथमिक लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय, नियमित तपासणीचे महत्त्व आणि लवकर निदानाबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विशेषतः स्तनाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत गैरसमज दूर करून महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे.कॅन्सरबाबत भीती न बाळगता जागरूक राहणे महत्त्वाचे आहे. आजाराचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक प्रभावी होऊ शकतात. त्यामुळे शहरातील सर्व स्तरातील महिलांपर्यंत जनजागृती आणि तपासणीची सुविधा पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे उपमहापौर देवकर यांनी स्पष्ट केले.
सोलापूर महानगरपालिका आणि इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या समन्वयातून या उपक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील कष्टकरी महिलांसह सर्वसामान्य महिलांपर्यंत आरोग्यविषयक माहिती आणि आवश्यक मार्गदर्शन पोहोचवून ‘कॅन्सरमुक्त सोलापूर’च्या दिशेने एक सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न आहे, असे उपमहापौर देवकर यांनी सांगितले.
Post Views: 6