सांगोला – विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचा उद्या शुक्रवार दि.४ सप्टेंबर रोजी शहरातील रामकृष्ण व्हिला येथे दु.२ वा. भव्य मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास मंत्री भरतशेठ गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, खा.ज्योती वाघमारे, खा.धैर्यशील माने, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, चंद्रहार पाटील, शिवसेना उपनेत्या दिपाली सय्यद उपस्थित राहणार असल्याची माहिती माजी आ.शहाजीबापू पाटील यांनी दिली.
तालुक्यातील पक्षाचे संघटन आणखी बळकट करण्याच्या दृष्टीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सांगोला तालुक्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढत असून माजी आ.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई येथे शेकापसह अन्य पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या मेळाव्यात देखील अनेकांचा प्रवेश होणार असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी सांगितले. दरम्यान तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्याच्या तयारीला जोमाने लागले असून संपूर्ण सांगोला शहर भगवेमय करण्यात आले आहे.