टेंभुर्णी : माढा मतदारसंघातील अडचणी सोडवून सर्व विकासकामे मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण पालकमंत्री या नात्याने बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे व रणजित भैय्या शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांच्या कोणत्याही मागणीसाठी सदैव तत्पर राहून मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाही सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. माढा तालुक्याचे माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर होते. हृदय प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर बबनदादा मायदेशी परतले ही आनंदाची बाब असून, आजारी असतानाही त्यांनी मतदारसंघातील रस्ते, पाणी व अपूर्ण कामांची विचारणा केली, असे गोरे म्हणाले. बबनदादांच्या स्वभावातील आपुलकी, सन्मान आणि विकासाची भूमिका यामुळे मागील ३० वर्षांत माढा मतदारसंघात धवलक्रांती, हरितक्रांती तसेच कृषी व औद्योगिक विकासाचे मोठे जाळे निर्माण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी रणजित शिंदे यांनी मांडलेल्या मागण्यांबाबत मोडनिंब एमआयडीसीचा फॉरेस्ट एनओसीचा प्रश्न सुटला असून सीना-माढा योजनेसाठी ३०० कोटी रुपयांची सुप्रमा, माढा तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये, श्रीपूर एमआयडीसीचा प्रश्न तसेच माढा शहराच्या नवीन पाणीपुरवठा पाइपलाइनला येत्या एक ते दीड महिन्यात मंजुरी देण्याचे आश्वासन गोरे यांनी दिले. उजनी धरण १०० टक्के भरले असले तरी पावसाअभावी निर्माण झालेल्या चारा-वैरण व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर सरकार गांभीर्याने विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, वीजबिल माफी तसेच कृष्णा फ्लड डायव्हर्शन योजनेसह विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचेही गोरे यांनी सांगितले. येत्या दोन महिन्यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलराव शिंदे कारखान्यावर बबनदादांच्या भेटीसाठी येणार असून यावेळी विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच गळीत हंगामाचा शुभारंभ व मोळीपूजन होणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
*पालकमंत्री जयकुमार गोरे — विशेष चौकट*
“माढा मतदारसंघाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि मी शिंदे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.”
*माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर* — विशेष चौकट
“कृष्णा फ्लड डायव्हर्शनमधून उजनीत ५१ टीएमसी पाणी येणार; शेतकऱ्यांनी चिंता करू नये.”
*रणजित शिंदे — प्रस्ताविक*
“माढा मतदारसंघातील रस्ते, वीज, सीना-माढा, एमआयडीसी व पाणीपुरवठ्याच्या प्रश्नांकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे.”
*माजी आमदार बबनराव शिंदे — “सर्वांचे प्रेम, आशीर्वाद मनापासून.”*
कार्यक्रमास आमदार राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, सचिन कल्याणशेट्टी, अरुण लाड, जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, माजी आमदार संग्रामदादा थोपटे, संजयमामा शिंदे, दिलीप माने, प्रशांत परिचारक, दीपक आबा साळुंखे, राम सातपुते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. यावेळी बबनदादांची धान्य, ग्रंथ, वस्त्र, फळे व पेढे यांची तुला करण्यात आली. रांजणी येथे आगमन झाल्यानंतर आडेगाव, शिराळ, टेंभुर्णी व कारखाना परिसरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कारखान्याच्या प्रवेशद्वारावर जेसीबी तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. बबनदादा शिंदे यांनी यावेळी डॉक्टर, कुटुंबीय, सहकारी व हितचिंतकांचे आभार मानत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यातर्फे दिवाळीसाठी शेतकऱ्यांना १०० रुपयांचा ऊस बिल हप्ता जाहीर केला. त्यामुळे मागील वर्षाच्या उसासाठी एकूण ३,१२५ रुपये प्रतिटन ऊस बिल मिळणार असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे आभार तोडकरी यांनी मानले
Post Views: 11