वडीगोद्री – अंबड तालुक्यातील शहापूर आणि धाकलगाव येथे जालना व बीडकडे जाणाऱ्या सर्व जलद एस.टी.बसेसना अधिकृत थांबा मंजूर करण्यात यावा,अशी आग्रही मागणी परिसरातील शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान,ग्रामस्थ व प्रवाशांच्या वतीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे (एस.टी.)निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.या संदर्भातील लेखी निवेदन जालना विभागाचे विभाग नियंत्रक सुरेश टकले तसेच जिल्हाधिकारी कार्यालय,जालना येथे सादर करण्यात आले आहे.
विद्यार्थी व प्रवाशांचे अतोनात हाल
अंबड तालुक्यातील शहापूर व धाकलगाव ही अत्यंत महत्त्वाची गावे असून या गावांशी लगतच्या अनेक खेड्यांचा दैनंदिन संपर्क आहे.शहापूर येथे दाढेगाव,रेवलगाव,बारसवाडा,मठ तांडा तर धाकलगाव येथे शोभानगर,पिठोरी शिरसगाव,नवीन पिठोरी शिरसगाव यांसह पंचक्रोशीतील हजारो नागरिक,विद्यार्थी,शेतकरी,कामगा
मात्र,या दोन्ही महत्त्वाच्या गावांमध्ये जलद बसेस थांबत नसल्यामुळे प्रवाशांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे.नाईलाजास्तव नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून यामुळे वेळेचा अपव्यय आणि मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.विशेषतः शाळा-महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून महिला व ज्येष्ठ नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे केल्या आहेत.शहापूर येथे जालना आणि बीडकडे जाणाऱ्या सर्व योग्य जलद एस.टी.बसेसना अधिकृत थांबा तातडीने मंजूर करण्यात यावा.धाकलगाव येथेही दोन्ही बाजूंनी धावणाऱ्या जलद बसेसना अधिकृत थांबा देण्यात यावा. प्रत्यक्ष प्रवासी व विद्यार्थ्यांची संख्या तसेच स्थानिक गरजेचा आढावा घेण्यासाठी महामंडळाने तातडीने स्थळ पाहणी व सर्वेक्षण अहवाल तयार करावा.प्रवासी सोयीनुसार बसेसचे वेळापत्रक व थांबे निश्चित करण्यात यावेत.प्रशासनाने यावर तात्काळ सकारात्मक कार्यवाही करून केलेल्या उपाययोजनांची लेखी माहिती द्यावी.
भारतीय राज्यघटनेतील समानतेच्या तत्त्वानुसार ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित,सुलभ आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे हे एस.टी.महामंडळाचे कर्तव्य आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सदर निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन मैंद,शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू विजय छल्लारे,मंगेश मुंढे,गणेश पवार,तान्हाजी धुमाळ,लक्ष्मण भडांगे यांच्यासह परिसरातील नागरिक व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने प्रवाशांच्या या रास्त मागणीवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी परिसरातून होत आहे.





















