टेंभुर्णी – मानवी जीवन हे संघर्षमय असून संघर्ष हा जीवनातील सुंदर शब्द आहे, यामुळे माणसाने अपयशाने खचुन न जाता संघर्षासाठी कायम तयार असले पाहिजे असे मत कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांनी मांडले विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या वतीने माजी आमदार बबनरावजी (दादा )शिंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कर्मयोगी व्याख्यानमालेत महात्मा फुलेंचा शेतकरी याविषयी ते बोलत होते.शिक्षण हे माणसाला अंधारातून बाहेर काढण्याचे काम करते त्यासोबत अधिकार जागृती करते, माणसाला निर्भय बनवणारे ते शिक्षण अशी शिक्षणाची परिभाषा महात्मा फुले यांनी केली होती, महात्मा फुले यांनी त्यांच्या काळातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या शेतकऱ्यांची शोषण अज्ञाना मुळेच होते. यामुळे महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शिक्षणासाठी खूप मोठे काम केले. महात्मा फुले हा देश शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा मानत त्यामुळे या देशातील राजकारण्यांनी राजकारण हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शोषितांच्या हितासाठी केले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. आजच्या काळातील शेतकऱ्यांची अवस्था फारशी बदलली नसून शेतकरी स्वतः पिकवलेल्या शेतमालाचा भाव ठरू शकत नाही, हे आजचे वास्तव त्यांनी मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र कदम यांनी केले, गेल्या सतरा वर्षापासून कर्मयोगी व्याख्यानमाला ही प्रबोधनाचा जागर करत असून आत्तापर्यंत विविध क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती प्रसिद्ध विचारवंत यांची व्याख्याने आयोजित करून महाराष्ट्राचा प्रबोधनाचा वारसा अतिशय खंबीरपणे महाविद्यालय जपत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार संजय मामा शिंदे होते. या कार्यक्रमाला विक्रमसिंह बबनरावजी शिंदे, बंडू नाना ढवळे, परमेश्वर खरात, सचिन होदाडे, नागेशबापू खटके, सचिन पवार प्रा. अशोक साळवे, प्रा. अशोक वाघमारे प्रा. डॉ. रविकांत शिंदे, टेंभुर्णी येथील पत्रकार, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी, सुनंदा विद्यानिकेतनचे सर्व शिक्षक, आर्या कॉलेज ऑफ फार्मसीचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post Views: 13