सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याबरोबरच रक्ताशी संबंधित आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर येथील हिरकणी महिला सशक्तीकरण केंद्र व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या पुढाकाराने भारत विकास परिषद आणि डॉ. हेडगेवार रक्तपेढी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हिमोग्लोबिन व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिमोग्लोबिन तपासणी शिबिरात २८० विद्यार्थिनींची, तर थॅलेसेमिया तपासणी शिबिरात ९४ विद्यार्थी-विद्यार्थिनींची तपासणी करण्यात आली. नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व, हिमोग्लोबिनची योग्य पातळी आणि थॅलेसेमियासारख्या आनुवंशिक रक्तविकाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे शिबिर उपयुक्त ठरले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत कुर्रा, सदस्य व आयुर्वेदिक कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे संचालक डॉ. किरण सारडा, सचिव श्री. मिलिंद फडके, एमबीए विभागप्रमुख डॉ. प्रीतम कोठारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीनिवास जगताप, हिरकणी महिला सशक्तीकरण केंद्राच्या समन्वयक प्रा. संध्या कटकम यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होता.
थॅलेसेमिया तपासणी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. श्वेता होटकर यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कु. निहार गाडगे यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन प्रा. संगीता माळी यांनी केले.
विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीची खरी गुंतवणूक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. केवळ आजाराचे निदान करण्यापुरते मर्यादित न राहता ‘वेळीच तपासणी, योग्य काळजी आणि निरोगी जीवन’ या आरोग्यदायी दृष्टिकोनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात शिबिर यशस्वी ठरले.
Post Views: 12