मंगळवेढा – मंगळवेढा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये वाढलेला भ्रष्टाचार आणि अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना आणि युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने सुरू असलेल्या बेमुदत धरणे व आमरण उपोषणाचा गुरुवारी (३ सप्टेंबर) तिसरा दिवस होता. प्रशासनाकडून अद्यापही मागण्यांची ठोस दखल न घेतल्याने आंदोलकांनी गुरुवारी मंगळवेढा प्रांत कार्यालयासमोर जोरदार ‘थाळीनाद आंदोलन’ करून परिसर दणाणून सोडला.अर्धनग्न आंदोलनानंतर थाळीनादचा दणका:उपोषणाच्या पहिल्या दिवशी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे दुसऱ्या दिवशी आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेत अर्धनग्न आंदोलन केले होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी, गुरुवारी शिवसैनिकांनी थाळी वाजवून प्रशासकीय ढिसाळ कारभाराचा तीव्र निषेध केला. या अनोख्या आंदोलनामुळे प्रांत कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आणि संपूर्ण तालुक्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले आहे.या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष सुरू:आंदोलकांनी नगर रचना विभागाच्या संशयास्पद झोन दाखल्याची चौकशी करणे, बेकायदेशीर फेरफार करणाऱ्या महसूल सहाय्यक श्री. शिवाजी भोसले यांचे निलंबन, गोपनीय माहिती उघड करणारे शिपाई श्री. नागेश महामुनी यांची बदली, आणि दोन्हीं बाजूंनी परस्परविरोधी निकाल देणारे मंडळ अधिकारी धनंजय इंगोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे. तसेच, न्यायालयाच्या निर्णयानुसार ‘महादेव कोळी’ जात प्रमाणपत्र तात्काळ मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली आहे.उद्या चौथ्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र होणार:सलग तीन दिवस उपोषण सुरू असल्याने आंदोलकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. तरीही प्रशासन लेखी आश्वासन देण्यास टाळाटाळ करत असल्याने आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर गुरुवारी रात्रीपर्यंत प्रशासनाने योग्य तोडगा काढला नाही, तर शुक्रवारी (४ सप्टेंबर) उपोषणाच्या चौथ्या दिवशी पक्ष संघटनेच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा शिवसैनिकांनी दिला आहे
Post Views: 8