करमाळा – पावसाने ओढ दिल्याने आधीच शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. त्यातच महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील झरे वीज उपकेंद्रावरुन जोडणी असलेल्या झरे परिसरातील शेतकऱ्यांनी गुरुवार दि.३ सप्टेंबर रोजी झरे उपकेंद्रासमोर ठिय्या मांडला.
मंजूर भारापेक्षा अधिक भार जोडला गेल्याने झरे वीज उपकेंद्रावरुन होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे झरे आणि परिसरातील शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षांपासून महावितरणला अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलनेही केली आहेत. यावेळीही वीज वितरणाबाबतच्या अनेक तक्रारी घेऊन सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी ही झरे परिसरातील शेतकऱ्यांनी करमाळा विभागाचे नूतन उपकार्यकारी अभियंता बारंगुळ यांना निवेदन दिले होते. मात्र निवेदन देऊन वीस दिवस लोटले तरीही या शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेतली गेली नव्हती.
त्यामुळे गुरुवारी सकाळी ९ वाजता या शेतकऱ्यांनी झरे वीज उपकेंद्रासमोर ठिय्या मांडला. सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी असलेल्या या शेतकऱ्यांनी यावेळी महावितरणच्या बार्शी विभागाचे कार्यकारी अभियंता मगर, जेऊर विभागाचे उप कार्यकारी अभियंता भोयर, करमाळा विभाग उपकार्यकारी अभियंता बारंगुळ यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधत तक्रारीचे निवारण करण्याची विनंती केली.
मात्र सुरळीत वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी अन्न पाण्यावाचून दुपारी दोन वाजेपर्यंत थांबलेल्या या शेतकऱ्यांची मानसिकता ढासळली व ते आक्रमक झाले. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता बारंगुळ यांना नाईलाजाने झरे उपकेंद्र गाठावे लागले. यावेळी संबंधित शेतकऱ्यांनी झरे उपकेंद्राला जोडलेल्या अतिरिक्त भारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित असल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर उपकार्यकारी अभियंता बारंगुळ यांनी जेऊर विभागाचे उप कार्यकारी अभियंता भोयर, संबंधित अधिकारी झुंजकर आणि या भागातील वायरमन आणि शेतकऱ्यांशी चर्चा करत शेतकऱ्यांच्या मागणीनुसार झरे उपकेंद्रावरील अतिरिक्त ट्रांसफार्मरचा भार सोडवून वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यानंतर या भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी हे ग्रामस्थ भगीरथ योजनेच्या वीज पुरवठ्याच्या प्रतीक्षेत असून लवकरच हा प्रश्नही मार्गी लावला जाईल असे आश्वासन बारंगुळ यांनी यावेळी दिले.
Post Views: 13