लऊळ : सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत, त्यांच्या समस्या गावपातळीवरच ऐकून त्यावर मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही व्हावी, या उद्देशाने आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘आमदार मुक्कामी आपल्या गावी’ या अभियानास लऊळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
माढा तालुक्याच्या इतिहासात प्रथमच आमदारांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. या उपक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने नागरिकांना आपल्या समस्या थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडता आल्या. त्यामुळे अनेक प्रश्नांवर तातडीने मार्गदर्शन मिळाले, तर प्रलंबित प्रश्नांवर पुढील कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या.
कार्यक्रमात औपचारिक सत्काराला फाटा देत आमदार अभिजीत पाटील यांनी नागरिकांच्या प्रश्नांना सर्वोच्च प्राधान्य दिले. महसूल, भूमिअभिलेख, श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, पंचायत समिती, अन्न व नागरी पुरवठा, कृषी, महावितरण, पशुसंवर्धन तसेच विविध शासकीय दाखले व योजनांशी संबंधित प्रश्न ग्रामस्थांनी मांडले.
संबंधित विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित असल्याने अनेक प्रश्नांवर जागेवरच मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रलंबित प्रकरणांवर आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
या उपक्रमामुळे ‘प्रशासनाच्या दारी जनता’ऐवजी ‘जनतेच्या दारी प्रशासन’ असे चित्र लऊळ येथे पाहायला मिळाले. नागरिक, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात थेट संवाद घडून आल्याने ग्रामस्थांना विविध विभागांशी संबंधित प्रश्न एकाच ठिकाणी मांडण्याची सुविधा मिळाली. त्यामुळे या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
अधिकारी उपस्थित
यावेळी प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, तालुका कृषी अधिकारी अविनाश चंदन, पोलिस निरीक्षक अतुल मोहिते, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता उद्धव जाधव, पुरवठा अधिकारी प्रीतम पवार, पाटबंधारे विभागाचे नाईकनवरे आणि गटविकास अधिकारी महेश सुळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती
यावेळी भारत शिंदे, महिला अध्यक्ष पल्लवी पाटील, प्रभाकर भोंग,खंडू भोंग, कल्याणजी गाडे, देविदास गांधले, सतीश मांदे, ॲड. उमेश लोकरे, भास्कर गाडे, राजाभाऊ भोंग, प्रभाकर नलवडे, दादासाहेब गांधले, दिगंबर भोंग, तसेच खंडू लोकरे, विकास गाडे, राजाभाऊ भोंग, सतीश भोंग, विजय गोरे, अमोल गणगे, मधुकर भोंग, बंडू भोंग, महेश भोंग यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 13