माढा : रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथे राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी दयानंद महाविद्यालय, सोलापूर येथील भूगोल विभागप्रमुख डॉ. वीरभद्र दंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी, मानवता, देशप्रेम आणि राष्ट्रविकासाची भावना रुजण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी ‘स्वतःपासून समाजाकडे आणि समाजातून राष्ट्राच्या विकासाकडे’ जाण्याची भूमिका स्वीकारावी,” असे प्रतिपादन डॉ. दंडे यांनी केले.
युवकांनी सामाजिक प्रश्नांविषयी संवेदनशील राहून सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सेवा, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. घन:श्याम हराळे होते. “शिक्षणातून सक्षम युवा वर्ग घडतो आणि सक्षम युवा वर्गातून शक्तिशाली राष्ट्राची निर्मिती होते,” असे त्यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. दत्तात्रय काळेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा मस्के यांनी केले, तर आभार प्रा. सुरेश धडस यांनी मानले.
यावेळी डॉ. अलका घोडके, डॉ. संगीता पैकेकरी, डॉ. पंकज ढमाळ, डॉ. सतीश घाडगे, प्रा. मयूर चव्हाण, प्रा. समाधान कदम, डॉ. वंदना कवितके, प्रा. सुषमा राऊत यांच्यासह विद्यार्थी व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.